गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... (एक लघुकथा)
□गायीचा मृत्यू आणि त्यानंतर... (एक लघुकथा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
त्याचे नाव बलदेवप्रसाद सिंह. हे नाव कसे उत्तर भारतीय किंवा बिहारी वाटते ना? पण बलदेवप्रसाद सिंह मात्र उत्तरभारतीय किंवा बिहारी नसून गेल्या कित्येक पिढ्यांपासून त्याचे कुटुंब महाराष्ट्रीयन झाले आहे. तर हा बलदेवप्रसाद सिंह महाराष्ट्राच्या वन विभागात फाॅरेस्ट गाॅर्ड पदावर कार्यरत होता. 1977-78 च्या महाराष्ट्रातील शासकीय कर्मचा-यांच्या 54 दिवसीय लांबलचक संपाच्या कालावधीत माझी व त्याची भेट व ओळख झाली होती.
म्हणजे झाले असे की लांबलेल्या संपामुळे विधान सभेच्या निवडणूकीकरिता शासकीय कर्मचारी उपलब्ध न झाल्याने शासनाने संपकालीन कर्मचारी (Strike Period Personnel = SPP) या नावाने काही बेरोजगार व काॅलेज विद्यार्थी यांची तात्पुरती नियुक्ती केली होती. या तात्पुरत्या कर्मचा-यांना निवडणूक कार्याचा कोणताच अनुभव नसल्याने तहसील कार्यालयात दररोज या तात्पुरत्या कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जात असे. मी सुद्धा एक काॅलेज विद्यार्थी म्हणून माझ्या सहमित्रांसोबत SPP होतो. त्या प्रशिक्षणादरम्यान माझी या बलदेवप्रसाद सिंह शी ओळख व मैत्री झाली होती.
फेब्रुवारी च्या पहिल्याच आठवड्यात शासकीय कर्मचा-यांचा लांबलेला संप मिटला असला तरी आमच्या कडून फेब्रुवारी अखेरपर्यंत निवडणूकीचे व इतर तत्सम कामे करवून घेऊन 28 फेब्रुवारी ला आम्हाला SPP च्या प्रमाणपत्रासह मोकळे करण्यात आले होते. या SPP प्रमाणपत्राचा उपयोग कायम शासकीय नोकरीत प्राथम्याने लागण्यासाठी होणार असल्याचे शासनाने घोषित केले होते. या संधीचा फायदा घेऊन बलदेवप्रसाद सिंह वन विभागात फाॅरेस्ट गाॅर्ड पदावर लागला होता.
बलदेवप्रसाद सिंह ला पूर्व विदर्भातील दर्रेकसा भागातील जंगलात नियुक्ती मिळाली होती. बलदेवप्रसाद एकटाच दर्रेकसा येथे एका घराच्या पडवीत भाड्याने राहात होता. लवकरच त्याचे लग्न झाले व तो पत्नीसोबत दर्रेकसा लाच वेगळ्या थोड्याशा मोठ्या खोलीत भाड्याने राहू लागला. देखता देखता दहा वर्षे कशी गेली, कळलेच नाही. या पूर्ण कालावधीत बलदेवप्रसाद चे स्थानांतर न होता तो तेथेच नियुक्त होता. या कालावधीत तो दोन गोड मुलींचा बाप झाला होता व त्याने आपली नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली होती.
1988-89 च्या दरम्यान बलदेवप्रसाद ला रोज रात्री स्वप्न पडू लागले की, जवळपासच्या उंच टेकडीवर एका देवाची मूर्ती गाडली असून ती मूर्ती बलदेवप्रसाद ने खोदून काढावी व तिची तेथेच प्रतिष्ठापना करावी. सुरूवातीला बलदेवप्रसादने त्याकडे दुर्लक्षच केले. पण वारंवारच्या स्वप्नांमुळे एके दिवशी अर्ध्या रात्री बलदेवप्रसाद एकटाच आपल्या तंद्रीतच कुदळ पावडा घेऊन त्या टेकडीवर गेला व खोदले असता त्याला एक ओबडधोबड देव-मूर्ती सापडली.
दुस-या दिवसापासून बलदेवप्रसाद पूर्णतः बदलूनच गेला. नोकरीवर जाणे सोडून तो त्या देव-मूर्तीच्या पूजा-अर्चेतच आपला वेळ घालवू लागला. गावोगावी फिरून मंदिर बांधण्यासाठी वर्गणी गोळा करू लागला. मंदिराचे बांधकाम सुरूही झाले आणि एके दिवशी अचानक बलदेवप्रसादची पत्नी व दोन्ही मुली गायबच झाल्या. त्या कुठे गेल्या, कुठे आहेत, कशा आहेत याची शहानिशा करण्याच्या भानगडीत(?) ना बलदेवप्रसाद पडला ना गाववाले पडले! बलदेवप्रसाद ला नोकरीतून बरखास्त करण्यात आले. तो आता बल्लूबाबा म्हणूनच ओळखला जात होता.
त्या टेकडीवर एक टुमदार मंदिर बांधले जाऊन त्यात त्या देव-मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा करण्यात आली होती. बल्लूबाबा आता दाढीधारी महंत झाला होता. त्या देवमूर्तीची व मंदिराची प्रसिद्धी होऊ लागली होती, गर्दी वाढू लागली होती, आवकही वाढली व बल्लूबाबाही प्रसिद्ध होऊ लागला होता.
बल्लूबाबा रात्री त्या जंगलातील उंच टेकडीवरील मंदिरात एकटाच निवास करीत असे. बल्लूबाबाने एक लाकडी गदा तयार करवून घेतली होती व ती गदा तो नेहमी आपल्या खांद्यावर वागवत असे.
एका सकाळी गावात बातमी पसरली की, बल्लूबाबाच्या मंदिरात एक धष्टपुष्ट गाय मरून पडली आहे आणि बल्लूबाबा तिला मीच आपल्या लाकडी गदेच्या ठोशाने मारले असल्याचे सांगतो आहे. ती गाय कोणाची आहे म्हणून खूप शहानिशा केल्यावरही मालक कोण हे कळू शकले नव्हते. बल्लूबाबा मात्र 'माझ्या हातून मोठी चूक झाली, आता मी प्रायश्चित्त घेणार' असे बडबडत होता. गायीच्या कलेवराला हलवूही देत नव्हता व हातही लावू देत नव्हता. गायीभोवती येरझारा मारत सतत बडबडत होता. अखेर रात्र झाली. गावकरी थकून, कंटाळून आपापल्या घरी परतले.
अर्ध्या रात्री च्या सुमारास टेकडीवर जोरजोरात घंटा वाजत असल्याचे व मोठी आग लागली असल्याचे गावक-यांना दिसून आले. काही हिंमतवान गावकरी लाठ्याकाठ्या घेऊन टेकडीवर पोचले. आणि त्यांना जे दृश्य दिसले ते पाहून सर्व गावकरी दिग्मुढ होऊन व बेबस होऊन देखतच राहिले. बल्लूबाबा आणि गाय पेटलेल्या सरणावर जळत होते.
(शब्द संख्या सुमारे 530)
(ता.क. :- या लघुकथेत एखाद्याला अंधश्रद्धा किंवा अंधश्रद्धेचे गुणगान आढळले, तर त्याने ती त्याची समस्या समजावी.)
□
@लखनपाल सिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(17.07.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment