एक स्मरणगाथा आणखी ......

□मी, माझे लिखाण आणि अनिल नितनवरे व कृष्णा चौधरी.□

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

     तसे पाहिले असता माझ्या आईने माझ्यावर केलेले वाचन-संस्कार व हायस्कूल मधील शिक्षिका सौ.मंदाकिनी सगदेव यांनी केलेले लेखन संस्कार यामुळे 1970-71 पासूनच मी ओबडधोबड लिहू लागतो होतो. 1971च्या शालेय स्नेहसंमेलनाच्या हस्तलिखित वार्षिकांकाचा मी विद्यार्थी-संपादक होतो. आणि त्या अंकासाठी मी लिहिलेला एक लेख "अपघातग्रस्त बस ची आत्मकथा" वाचून हा लेख मी स्वतः लिहिला नसून कुठून तरी चोरलाय अशी रोखठोक तंबी सुद्धा मला "प्राप्त" झाली होती. अखेर सगदेव मॅडम नी माझ्यावर विश्वास दाखवला व तो लेख अंकात समाविष्ट करण्यात आला. पण बांगला मुक्ती संग्रामाच्या धामधुमीत त्यावर्षीचे स्नेह संमेलन स्थगित करण्यात आल्याने त्या अंकाचे प्रकाशन त्यावर्षी होऊ शकले नव्हते. 1972 मध्ये मी धोटे बंधू सायंस काॅलेज गोंदिया चा बी.एस्सी. फर्स्ट ईयर चा विद्यार्थी असताना आदर्श विद्यालय आमगांव च्या त्यावर्षीच्या स्नेह संमेलनाचे मुख्य अतिथी गो.नी.दांडेकर यांच्या हस्ते त्या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. 

     बी.एस्सी. फर्स्ट ईयर ला मी ऑप्शनल विषय मराठीच घेतला होता, कारण माझी मराठी लिखाणाची आवड. बी.एस्सी.च्या कालावधीत मी वर्गात बसून शेकडो कविता लिहिल्या असतील, त्या केव्हाच शहीद झाल्या. याच दरम्यान गोंदिया-हिंदी चा प्रभाव वाढून व मातृभाषा पोवारी/हिंदी मुळे मी हिंदीतूनही लिहू लागलो. "प्रकाशित मन" या हिंदी मासिक पत्रिकेचे संपादक दयानंद वर्मा यांच्या कृपेने माझे हिंदी-लिखाण वेगवेगळ्या हिंदी नियतकालिके आणि अनियतकालिके यातून प्रकाशित होऊ लागले. पर्यायाने मराठी लेखनाकडे थोडेसे दुर्लक्षच होऊ लागले. हिंदी तील "दिनमान" साप्ताहिकाचे संपादक सर्वेश्वरदयाल सक्सेना वयाच्या अडसराला डावलून मला मित्रत्वाने संबोधू लागले. 'रविवार', 'सारिका', धर्मयुग, हिंदुस्तान, समकालीन साहित्य, आदितून माझ्या पत्रांची दखल घेण्यात येऊ लागली. बीबीसी हिंदी सेवा चा नियमित पत्रलेखक म्हणून गोंदियाचेच माझे वर्गमित्र गिरीन दवे यांच्या सोबत माझेही नाव होऊ लागले. 

      आणि अशातच एका अकस्मात खेळीने मी शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज गोरेगांव येथे ऑक्टोबर-1978मध्ये टेम्पररी शिक्षक म्हणून रुजू झालो. आता मराठी ने हिंदीवर मात करायला सुरूवात केली व मी हळूहळू हिंदी पासून दूरच झालो. एप्रिल 1978 मध्ये "लोकमत"च्या "साहित्य जत्रा" या तत्कालीन प्रभावशाली पुरवणीतून माझी मराठी कविता "थेंब" प्रकाशित झाली व मी मराठी कडे वळलो. मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार तथा वर्तमान सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून रूजू झाल्याने मराठी-प्रेम स्वाभाविक रित्या आणखीच उफाळून आले.

     या दरम्यान व त्यानंतरही माझे मराठी लिखाण (कविता, कथा, लेख) काही थोड्या ठिकाणी प्रकाशित होतच राहिले. नोकरीच्या एका टप्प्यावर नोव्हेंबर 1990 मध्ये मी साकोली येथे बदलून आलो. काही काळातच साकोली काॅलेज चे मराठी चे प्राध्यापक अनिल नितनवरे यांच्यासोबतच्या पत्रओळखीचे प्रत्यक्ष ओळखीत "रूपांतर" झाले. त्यांच्यासोबत लांबलचक साहित्य-चर्चा होऊ लागल्या. माझी मराठी लेखन-हमाली सुरूच होती आता ती वाढली. यशवंत मनोहर यांच्या "समुचित" मधूनही लिहिता आले. जून-जुलै 1993 मध्ये रामटेक येथे बदलून गेलो व तेथे लवकरच कृष्णा चौधरी या मराठीच्या एका अवलिया-सम मोठ्या साहित्यिक प्राध्यापकाशी मैत्री झाली.

    कृष्णा चौधरी यांनी माझा कविता-संग्रह प्रकाशित करण्यासाठी माझ्यामागे तगादा लावायला त्यांचे दोन विद्यार्थी (गिरीश सपाटे आणि जितेंद्र वासनिक यांना) लावून दिले व ते स्वतः सुद्धा रोजच त्यासाठी माझ्यामागे तगादा लावू लागले. अखेर मी माझ्या प्रकाशित/अप्रकाशित, विखुरलेल्या, काही कविता शोधल्या व त्या त्यांच्याकडे प्रस्तावनेसाठी सोपवल्या. पण या संग्रहासाठी पात्र ठरू शकल्या असत्या अशा कित्येक कविता माझ्या अनागोंदी-ठेवणूकीमुळे शहीद झालेल्या होत्या. हा संग्रह मात्र "प्रमेय" या नावाने जानेवारी 1996 मध्येच उगवू शकला. दरम्यान जून-1995 मध्ये मी रामटेक हून बदलून अर्जुनी/मोरगांव या अगदी आडवळणाच्या व आदिवासीबहुल तथा नक्षलग्रस्त तालुका स्थळी बदलून आलो होतो. अर्जुनी/मोरगांव ला प्रकाशनाची काहीच सोय नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी येथील एका लग्नपत्रिका छापणा-या प्रिंटरकडून मी माझा पहिला-वहिला कविता संग्रह "प्रमेय" (माझ्याच रेखाटनाच्या मुखपृष्ठासह) कसाबसा प्रकाशित करू शकलो. याचा प्रकाशन समारंभ साकोली येथे अनिल नितनवरे यांनीच घडवून आणला. 

     एकंदरीत मी अनिल नितनवरे आणि कृष्णा चौधरी यांच्या संपर्कात आलो नसतो तर माझे सारे लिखाण कदाचित आजवर शहीदच झाले असते व मी फक्त एक वाचकच उरलो असतो. आजही मी सर्वप्रथम "वाचक"च आहे, त्यानंतरच माझ्या ओबडधोबड लिखाणाचा क्रम लागतो. आज मागे वळून पाहताना आता निसर्ग-शरण झालेल्या माझ्या या दोन्ही मित्रांचे (अनिल नितनवरे आणि कृष्णा चौधरी) प्रेम व ऋण आठवून मी त्यांच्याप्रती कृतज्ञ असल्याचा मला अभिमान वाटतो.

@लखनसिंह/लखनपाल सिंह कटरे.

बोरकन्हार-441902,  जि.गोंदिया (14.07.2019)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन