तो आणि ती...(एक लघुकथा)

तो आणि ती. (एक लघुकथा)

~~~~~~~~~~~~~~~~~~

    ही कथा आहे तो आणि ती ची. तो योगेश आणि ती योगिता. योगेश चे शिक्षण बारावी पर्यंत तर योगिता बी.ए.गॅज्युएट. योगेश आपल्या आईवडिलांना एकुलता एक, ना भाऊ ना बहीण. शेती दहा एकर. गोंदिया जिल्ह्यातील कोरडवाहू, धानाची शेती. पाऊसपाणी व्यवस्थित पडला, धानावर रोगराई नाही आली, वेळेवर मजूर-वन्यार भेटले व त्यांनी बेईमानी न करता इमानदारीने शेतकाम केले तर त्यावर्षी शे-दीडशे क्विंटल धान व्हायचे. पण असा हंगाम तिन-चार वर्षातून एखादाच. बाकीच्या साली पन्नास क्विंटल धान झाले तरी खूपच म्हणायचे. तसा घरी खाऊन-पिऊन सुखी म्हणता येईल असा. तरी आई वडिलांनी त्याला शिक्षणासाठी खूप डिवचले, डी.एड.करून मास्तर तरी हो म्हणून खूप ढोसण्या लावल्या. पण योगेश काही बधला नाही. त्याला शेतीकामातच आनंद होता. आईवडिलासोबत तो शेती सांभाळणे शिकला होता. आजच्या उच्छृंखल तरुणाईत एक कोणतीच महत्वाकांक्षा नसलेला बायल्या जीवच म्हणा ना!

       योगिता आपल्या आईवडिलांची पाचवी लेक. मुलाच्या आशेत पाच मुली झाल्या आणि शेवटी तिचे आईवडील थकून थांबले. घरी तीन एकर कोरडवाहू धान-शेती. त्यातून मिळणारे उत्पन्न म्हणजे कधीतरी पंधरा-वीस क्विंटल धान. मग तिचे आईवडील दुस-याच्या शेतात मोलमजूरीला जायचे, रोजगार हमीच्या कामावर जायचे. पहिली मुलगी फक्त नववीपर्यंतच शिकली व तिचे लग्न उरकण्यात आले. जावई सुद्धा अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर. दुसरी दहावीत असताना पळून गेली. तिचा पत्ता काही लागला नाही. तिसरी बारावी पास. तिचा नवरा एका खाजगी शाळेत चपराशी. चौथी बी.ए.फर्स्ट ईयर मध्ये असतानाच साप चावून मरण पावली. योगिता पाचवी. बी.ए.पास. तिला योगेश नावाचा बारावी पास दहा एकराचा शेतकरी नवरा भेटला. तशी योगिता सुखी-समाधानी होती. योगेशला वाईट सवयी, व्यसन आदि नव्हते. योगेशच्या फटफटीवर नातेवाईकांकडे जाण्या-येण्यात योगिता खुशच होती.

     पण एक दुःख होते. लग्नाला दहा वर्षे झाली, पण पाळणा काही हलला नव्हता. योगेश आणि योगिता दोघांच्याही आई वडिलांनी खूप सारे नवस, उपास-तापासादि पारंपारिक व आधुनिक डाॅक्टरी सुद्धा उपाय केले. पण फळ आले नाही. एक बरे होते की योगिता चे सासू सासरे समंजस होते. त्यांना नातवाचा तोंड पाहण्याची उत्कट इच्छा असली तरी त्यांनी कधी चुकूनही योगिता ला कटूवचन सुनावले नाही. त्यामुळे योगिता आणखी दुखी व्हायची. जर सासू सासरे कजाग असते तर प्रतिक्षिप्त दुख झेलणे सोपे गेले असते, असे तिला वाटायचे. सासू सास-याचा समंजसपणा आणि त्यांचे प्रेम व आपुलकी पाहून योगिता आणखीनच अस्वस्थ व्हायची. ती मग योगेश वर आपला राग काढायची, त्याच्याशी अकारणच भांडायची, त्याला अद्वातद्वा बोलायची. योगेश तिच्या या वागणूकीने त्रस्त होऊ लागला होता. तो हळूहळू मौनच राहू लागला. शेतीकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले. उत्पन्न घटू लागले. चिडचिड वाढू लागली.

     योगिता दिवसेंदिवस अधिकाधिक आक्रमक होऊ लागली. तिच्या बोलण्यात अपमानाचा कडेलोट असे. सासू सासरे मात्र मूक दर्शक बनून हतबलासारखे बसून दिवसरात्र झुरू लागले. योगेश एकटाच शेतात जाऊन तासंतास एखाद्या झाडाखाली निरूद्देश्य बसून राहू लागला. तो दिवसेंदिवस खंगू लागला. पण योगिताच्या वागणूकीत कोणताही सुधार न होता तिच्या तोंडातील शब्दांना आता धरबंधच उरला नाही. 

     एके दिवशी सकाळी सकाळीच योगिताच्या निरर्थक बडबडीला कंटाळून योगेश नेहमीप्रमाणे शेताकडे निघून गेला. मार्च चे शेवटचे दिवस होते. योगेश शेतातील एका प्राचीन आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसून झाडाला लागलेल्या आंब्यांकडे एकटक पाहू लागला. हळूहळू तो तंद्रीत गेला. त्याने पाहिले की, झाडावरील दोन आंबे आपोआप लोंबकळत त्याच्याकडे खाली खाली येऊ लागले. त्याच्या डोळ्यासमोर येऊन ते दोन्ही आंबे पटकन त्याच्या समोर धरतीवर सांडले. आणि त्या आंब्यातून दोन सुंदर कन्या बाहेर पडल्या. दोघींचे वय सारखेच व तीनेक वर्षांचे असावे. त्यापैकी एकीने योगेशच्या डोळ्यातील अश्रू आपल्या फ्राॅक ने पुसले. दुसरी त्याच्या छातीला आपल्या नाजुक छोट्या छोट्या हाताने कनटाळून त्याला बिलगली. पहली आपल्या बोबड्या बोलीत म्हणाली, बाबा चला घरी जाऊ, भूक लागली. मायने दार-भात रांधून ठेवला आहे. दुसरी म्हणाली, बाबा इथे काय करता, घरी आजी आजोबा आणि माय तुमची वाट पाहत आहेत. चला घरी जाऊ. अखेर दोघींच्या प्रेमळ आग्रहाने भारावून योगेश त्यांच्या सह घरी आला.

     त्याच्यासोबत त्या दोन निरागस, सुंदर कन्या पाहून योगिता बिथरली. तिने आदळआपट सुरू केली. ती योगेश आणि त्या दोन्ही कन्यांवर पावशी धरून चवताळून धावून गेली. म्हणाली, "मला वाटलेच होते, तुम्ही रोज रोज शेतात जातो म्हणून तास-तास गायब राहात होते, तेव्हा तुम्ही दुसरी बायको केलीच असेल. मला मूलबाळ होत नाही म्हणून माझ्या उरावर तुम्ही सवत आणता होय? पण मी काही लेचीपेची नव्हे, ग्रज्युएट आहे. मी या दोन्ही पोरींना मारून टाकीन आणि त्या सवतीलाही कापून टाकीन. ....." योगेश व त्याच्या आईवडिलांनी योगिता ला सावरण्याचा खूप प्रयास केला. पण योगिता ला आवरणे व सावरणे त्यांच्याने शक्य झाले नाही. आणि अखेर योगिता ने त्या दोन्ही कन्यांना पावशीने मारून, कापून मारून टाकले. त्या दोन्ही कन्या रक्तबंबाळ होऊन अंगणात निर्जीव पडून होत्या,... योगिता अट्टाहास करीत होती... आणि योगेश व त्याचे आईवडील हताश होऊन पाहत बसले होते.........!

(शब्द संख्या सुमारे 610) 

@लखनपाल सिंह कटरे "अपराधी"

बोरकन्हार-441902, जि.गोंदिया

(चलभाष:- 7066968350)

 (16.07.2019/गुरूपौर्णिमा)  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन