मा.मुख्यमंत्री यांना स्मरणपत्र , दि.12.07.2019
□तिस-या वर्षीचे स्मरणपत्र... दि.12.07.2019
×××××××××××××××××××××××××××××××××
जाहीर विनंती अर्ज दि.12 जुलै 2017
-----------------------------------------------------------
मा.मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
मुंबई-400032
विषय:- गोंदिया जिल्हा अजूनही महाराष्ट्रातच (विदर्भाच्या अगदी पूर्व टोकावर) असल्याची खात्री करून या जिल्ह्याकडेही थोडेसे लक्ष देण्याबाबत विनंती अर्ज...
सादर प्रणाम,
सर्वप्रथम आपले शतशः आभार की, आपण शिरपूर धरणासाठी (कदाचित धरण बांधण्यात आल्यापासूनच शासनाकडून दुर्लक्षित असलेल्या धरणासाठी) पहिल्यांदाच भरीव तरतूद करून आम्हा धरण-लाभार्थ्यांवर कृपादृष्टी टाकली. आपल्याकडून आम्हाला आणखी काही बहुप्रतिक्षित पण सदैव दुर्लक्षित राहिलेल्या आमच्या भागातील कामांसाठी सुद्धा मदतीची अपेक्षा आहे.
त्यापैकी महत्वाचे म्हणजे, देवरी-आमगांव-गोंदिया या 'बहुप्रवाहित' (24 तास वाहनग्रस्त? असलेल्या) रस्त्यावरील बाह्मणी आणि किडंगीपार येथे अतिशीघ्र रेल्वे उड्डाण पुलांची व्यवस्था करून देणे. मुंबई-कोलकाता या रेल्वे रूटवरील या दोन्ही चौक्यांमुळे या रस्त्यावरील वाहतुकीची वारंवार कोंडी होते. आता लवकरच हा रेल्वे रूट तीन पदरी होत आहे, त्यानंतर तर या रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय त्रासदायक व वेळखाऊ ठरणार आहे. सबब ही व्यवस्था अतिशीघ्र होणे या भागातीलच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशी जनता व वाहनांसाठी आवश्यक ठरते आहे.
आपण नागपूर(खापरी) येथील उड्डाण पुलासाठी जसा पुढाकार घेऊन ते काम शीघ्रतेने तडीस नेले, त्यानुसार या कामालाही आपण प्राधान्य द्यावे ही विनंती आहे.
विदर्भाच्या इतिहासात प्रथमच श्री.नितीनभाऊ, आपण व चंद्रपूरचे सुधीरभाऊ यांच्या सारखे धडाडीचे नेतृत्व विदर्भाला लाभले आहे, ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मी आमच्या भागातील जनतेची एक अग्रक्रमाची मागणी आपल्यापुढे सविनय सादर करीत आहे आणि आपण आमची ही मागणी शीघ्रताशीघ्र पूर्ण कराल अशी आशा बाळगून आहे.
(आपल्याशी इमेल व ट्वीटर वर संपर्क साधण्याचे माझे सारे प्रयत्न निष्फळ ठरल्याने हे जाहीर निवेदन करीत आहे, त्याबद्दल क्षमस्व.)
आपला,
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~(12.07.2017)~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment