□मी सुद्धा आणखी एक मूर्ख .....!
●मी सुद्धा आणखी एक मुर्ख...!
~~~~~~~~~~~~~~~~~
रामदास स्वामींनी "दासबोधा"त मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी एका लक्षणाचे अनुसरण करण्याची व स्वतःला मुर्ख सिद्ध करण्याची संधी मी सोडत नसतो. आजही मी त्या संधीचा "वापर" करीत आहे. क्षमस्व.
पण त्यापूर्वी डाॅ.गणेश देवी यांच्या "वानप्रस्थ" या ग्रंथातील 'परंपरेच्या शोधात' या निबंधातील काही वाक्ये उद्घृत करू इच्छितो. ती वाक्ये अशी :-
"...परंपरेच्या आंधळ्या भक्तीमध्ये विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची ताकदच नाहीशी करण्यात येते. आधुनिकतेच्या अति उत्साहात भावनांचा हकनाक बळी पडतो व परंपरा आणि आधुनिकतेचे मिश्रण बनवण्याच्या हट्टामध्ये सांस्कृतिक स्मृती व कल्पनाशक्ती या दोन्ही खंडित होत राहतात. परंपरेकडे या तीन विचारपद्धतीपेक्षा वेगळ्या रीतीने पाहण्याची कोणतीच पद्धत नाही का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आदिवासी परंपरा व परंपरेकडे पाहण्याचा आदिवासी दृष्टिकोण समजून घेणे उपयोगी ठरावे."
आता माझ्या मुर्खपणाला सुरूवात करतोय. तर सुरूवात अशी की, माझा जन्म मोठ्या नवसा-गवसाच्या अनुपालनानंतर झाला असून ते नवसादि 'उपक्रम' आदिवासी परंपरेतीलच होते. माझ्या आजोबांचा (उकन पाटील यांचा) मृत्यू साथीच्या काॅल-यामुळे तडकाफडकी झाला तेव्हा माझ्या वडिलांचे वय अवघे एकोणवीस वर्षांचे होते. आणि अशा प्रसंगी त्याकाळी अकल्पित "गाव-समस्या" उद्भवून जमीनजुमला, जंगम संपत्ती वगैरे हडपण्याचे कसे-कसे प्रयत्न(?) होत असत, याची कल्पना आज कदाचित करता येणार नाही. अशावेळी आदिवासी गोंड समाजातील शिवलाल कुंभरे या आमच्या तत्कालीन आवारीने पुढाकार घेऊन परिस्थिती योग्यप्रकारे हाताळण्यास दिलोजानने माझ्या वडीलांना सक्रीय मदत केली. पर्यायाने शिवलाल बडो आमच्या परिवाराचाच अभीन्न घटक झाला व त्याच्या आदिवासी परंपरेनुसार नवसादि उपक्रम करण्यात आले. हा शिवलाल बडो शेळी/बकरी व तिचे दुध यांचा "विटाळ" मानत असे. आमच्या गावात गोंड समाजाचे खूप कुटुंब असून त्यांच्या परिवारांशी आमचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. बाजीराव बाबा हा गोंड समाजातील एक नावाजलेला लिडर होता. (अशोक मेहता, नारायणभाऊ बहेकार, पी.डी.राहांगडाले यांच्याशी तो संबंधित होता.) याचेही संस्कार बालपणी माझ्यावर झालेत. या बाजीराव बाबाचे दोन नातू भोजलाल व हंसराज हे माझ्या वयाच्या 22-23 वर्षापर्यंत माझ्या "सेवेत" ठेवण्यात आले होते. एकंदरीत आदिवासी/गोंड समाजाशी व परंपरेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझी नाळ अशाप्रकारे बालपणापासूनच जुळली होती, असे म्हणावयास हरकत नसावी.
माझ्या साडेसहा वर्षाच्या शिक्षकी "पेशा"पैकी साडेपाच वर्षे मी देवरी (तत्कालीन जि.भंडारा व सद्यकालीन जि.गोंदिया) या तत्कालीन आदिवासीबहुल गावातील जि.प.हायस्कूल/ज्युनिअर काॅलेज मध्ये वर्ग 5 ते 12 पर्यंत मुख्यतः गणित व विज्ञान हे विषय तथा प्रासंगिक दृष्ट्या "कोणताही विषय" (मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून) शिकवण्या(?)त व्यतीत केले आहेत. या हायस्कूल/ज्युनिअर काॅलेज मधील 60%हून अधिक विद्यार्थी हे आदिवासी समाजातील होते. त्यापैकी बहुतेक विद्यार्थी तेथील भन्साळी आदिवासी होस्टेल मध्येच राहत असत. मी अन्य शिक्षकांसोबत या होस्टेल ला नेहमी भेटी द्यायचा तेव्हा "आदिवासी परंपरा" हळूहळू आणखी कळू लागली होती. या आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील कबड्डी व खोखो खेळात नंबर पटकावल्यावर राज्यस्तरावरील खेळासाठी बाहेरगावी जाताना त्यांच्या ट्रेनच्या पहिल्यावहिल्या प्रवासात ते ट्रेनमध्ये अक्षरशः नाचले होते. कारण त्यांनी पहिल्यांदाच ट्रेन पाहिली होती व ते ट्रेनचा नवलाईचा प्रवास करीत होते. अशा अगदी ख-या(!) रूपा/स्वरूपातील आदिवासी विद्यार्थ्यांना साडेपाच वर्षे शिकवता-शिकवता मीच खूप काही शिकू शकलो. या "शिकण्या"द्वारे माझ्या गावातील माझ्या बालपणीचे शिवलाल बडो आणि बाजीराव बाबा यांच्या द्वारे मिळालेल्या माझ्या संस्कारात बेरीजच झाली. देवरीत असताना तेव्हा माझ्या सेवेत हंसराज हा बाजीराव बाबाचा नातू (गोंड समाजाचा) होता. स्वैंपाकादि, माझी सारी कामे तोच करायचा. तशातच, तत्कालीन देवरी तालुक्यातील (किंवा गडचिरोली जिल्ह्यातील कोरची/कुरखेडा तालुक्यातीलही असू शकतो, निश्चित आठवत नाही आज!) कोटगुल या अतिदुर्गम गावातील एका गोंड समाजातील नववीच्या विद्यार्थ्याला मी वर्षभरासाठी "दत्तक" घेतल्याने तो सुद्धा, माझा सेवक हंसराज सोबत, माझ्याकडेच रहायचा. त्याच्या जेवण्याखाण्याचा व शैक्षणिक खर्च मीच करायचा. त्याच्या त्या वर्षभराच्या माझ्याकडील वास्तव्यात मी त्याला कितीतरी वेळा माझ्या स्वगावी सुद्धा सोबत घेऊन गेलो होतो. या कालावधीत मला जे आढळून आले ते असे की, अगदी कमी बोलणे, पूर्ण इमानदारीची वागणूक, अलिप्ततेचे व एकांतपणाचे आकर्षण, रागावर भलतेच नियंत्रण, स्वतःच्या मर्जीलाच प्राथम्य व प्राधान्य देणे, असे काही त्याच्यातील गुण/अवगुण!!! (तो नंतर नक्षलवादाला शरण गेल्याचे कळले.)
माझ्या या साडेपाच वर्षांच्या शिक्षकी पेशा(?)त आदिवासी परंपरा, आदिवासी संस्कृती, परंपरेकडे पाहण्याचा आदिवासी दृष्टिकोण या बाबीसंबंधाने माझ्या समजूतीत व ज्ञानानुभवात भरपूर बेरीज झाली.
याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा मला माझ्या शिक्षकी पेशा(?)नंतरच्या राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात एक तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख म्हणून अधिकारी या नात्याने काम करताना झाला व तो अनुभव मला माझ्या प्रशासनातही फारच उपयोगी ठरला. ता.पाटोदा (जि.बीड), ता.सालेकसा (जि.भंडारा/गोंदिया), ता.रामटेक (जि.नागपूर), ता.अर्जुनी/मोरगांव, ता.देवरी, ता.सडक अर्जुनी (तिन्ही जि.भंडारा/गोंदिया) या आदिवासी (नक्षल प्रभावित) तालुक्यात तालुका प्रमुख म्हणून तर जि.चंद्रपूर, जि.गडचिरोली, जि.यवतमाळ या आदिवासी/आदिवासी बहुल (नक्षल प्रभावित) जिल्ह्यात जिल्हा प्रमुख म्हणून मला माझ्या या पूर्वानुभवाचा खूप खूप उपयोग झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा या दुर्गम व आदिवासी बहुल (नक्षल प्रभावित) भागात खूप वर्षांपासून कापूस सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकवला जायचा/जातो. पण तेथे 2008 पर्यंत महाराष्ट्र शासनाची कापूस एकाधिकार व नंतरची स्पर्धात्मक योजना कधी राबवलीच गेली नव्हती. पर्यायाने तेथील कापूस उत्पादक शेतक-यांना व्यापा-यांद्वारे लूटी(?)चा अपर्यायी सामना करावा लागे. जून 2008 मध्ये मी तिथे जिल्हा उपनिबंधक या सहकार विभागाच्या जिल्हा प्रमुख पदी स्वमर्जीने (माझ्या विनंती नुसार) बदलून गेल्यावर ही बाब माझ्या लक्षात आली. आणि त्यावेळचे गडचिरोली चे जिल्हाधिकारी श्री.निरंजनकुमार सुधांशु व कापूस पणन महासंघाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्री.उज्ज्वल उके यांच्या मार्गदर्शनाखाली मला सिरोंचा येथे पणन महासंघाचे खरेदी केंद्र उघडून घेण्यात यश आले होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी सोय उपलब्ध होऊ शकली. मला माझ्या जीवघेण्या अपघातामुळे व सुधांशु सरांनंतर बदलून आलेल्या एका "अमाणूस" जिल्हाधिका-यांच्या मानसिक छळाला कंटाळून तेथून लवकरच बदलून जावे लागले आणि ते कापूस खरेदी केंद्र नेहमीसाठी बंद झाले.
माझ्या या आदिवासी परंपरा, संस्कृती, परंपरेकडे पाहण्याचा आदिवासी दृष्टिकोण यांच्या बालपणापासूनच्या, कदाचित योगायोगाच्या, प्रत्यक्ष अनुभवामुळे माझ्या लिखाणात सुद्धा (कविता, कथा, लेख लिहिण्यात) या अनुभवांचा वाटा स्वाभाविकपणेच अत्यधिक आहे. म्हणूनच नागरी/शहरी तथा पूर्वाश्रमीचे ग्रामीण व आताचे शहरी/नागरी साहित्यिकांपैकी बहुतांश मराठी साहित्यिकांना माझ्या लिखाणातील (कविता, कथा, लेख यातील) बहुतेक संकल्पना, शब्दसमूह, प्रतिमाव्यूह, (वगैरे काय म्हणतात ते!) बाष्कळ, दुर्बोध, ओढाताणीच्या, व्याकरणदुष्ट, गूढ, इत्यादी वाटतात.
डाॅ.गणेश देवी यांच्या यासंदर्भातील लिखाणाचे वाचन, अवगाहन केल्यावर मात्र मला जरा दिलासा मिळाला. आदिवासी परंपरा, संस्कृती, परंपरेकडे पाहण्याचा आदिवासी दृष्टिकोण या बाबींवरील डाॅ.देवी यांचे लिखाण वाचल्यानंतरच असा हा मुर्खपणा करावा असे प्रकर्षाने वाटले आणि केला हा मुर्खपणा! माझ्या या मुर्खपणाला रामदास स्वामींनी "दासबोधा"त केव्हाचेच व्याख्यायित केले असल्याने असा हा मुर्खपणा करण्याची माझी हिंमत(?) वाढली. असो. माझ्यासारख्या मुर्खांना व त्यांच्या मुर्खपणाला सलाम, प्रणाम, नमस्कार!!!
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
□□□□□
Comments
Post a Comment