□सत्तांतर आणि त्यानंतर...

□सत्तांतर आणि त्यानंतर...
~~~~~~~~~~~~~~

      माझ्या आकलनानुसार 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री जे सत्तांतर (TRANSFER OF POWER) घडले त्या घटनेला वास्तविक आणि ख-याखु-या भारतीय संकल्पनेच्या स्वातंत्र्यात तब्दील करण्यात तत्कालीन सत्ता-राबवणूकदार पूर्णांशाने सफल झाले नाहीत. रामचंद्र गुहा त्यांच्या एका लेखात नमूद करतात त्यानुसार  डिसेंबर 1947 मधील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील "ध्येये आणि उद्दिष्टे" खरोखरच, खुल्या मनाने राबवण्यात आली काय, हा अतिशय कटू वस्तुस्थितीचा प्रश्न आहे. ती "ध्येये आणि उद्दिष्टे" खरोखरच राबविण्यात आली असती तर कट्टरवादी, मूलतत्त्ववादी, ताठर मुल्ला-मौलवींपेक्षा हमीद दलवाई सारख्या सच्च्या विचारवंत सुधारकांना महत्त्व देण्याचे धोरण आणि सोबतच "समान नागरी कायदा करण्याचे राज्यघटनेने दिलेले आश्वासन" सत्यात उतरवण्यात नेहरूंना अपयश आलेच नसते. पण "मतांच्या स्वार्थी राजकारणा"पायी व एकगठ्ठा मतांच्या लोभापायी "धर्मनिरपेक्षता" या मूळातच वदतोव्याघात अशा संकल्पनेला छद्मी, ढोंगी आणि अल्पसंख्याकांचे लांगूलचालन-जनक रूप देण्याचेच धोरण राबविण्यात आले. रामचंद्र गुहा यांनी यांच्याच "देशभक्त आणि अंधभक्त" या ग्रंथातील "काँग्रेसमधील चमचेगिरीचा संक्षिप्त इतिहास" या निबंधात यासंदर्भात काही पूरक विधाने केलीच आहेत. 
     भारताचा इतिहास 1526 नंतरच सुरू होत नसून त्यापूर्वी व त्यानंतरही मूगल, इंग्रज, डच, शक, हूणादिंच्या काळातही मूळ भारतीय संस्कृती जपणारी इतर समृद्ध व विशाल साम्राज्ये सुद्धा होती. परंतु सत्तांतर नंतरच्या शिक्षण व अभ्यासक्रमातून फक्त मूगल व इंग्रज यांच्याच एकांगी ऐतिहासिक गोष्टी शिकविल्या गेल्यात. भारतातील मुस्लीम, ख्रिश्चनादि लोकसंख्येत 85-90% पर्यंत धर्मांतरीत लोकसंख्या असल्याचा खरा इतिहास कोणत्याही द्वेष व आकस बुद्धीशिवाय शिकविण्यात आला असता तर आज या धर्मांतरीत लोकसंख्येने आपली मुळे व संस्कृती ... भारताबाहेर न शोधता भारतालाच पितृभूमी/मातृभूमी जाणून इथल्या मातीशी ईमान राखण्याचे धैर्य एकवटले असते. आणि पर्यायाने आजची अलगाववादी, परात्मवादी, परदेश-पक्षपाती वृत्ती फोफाळलीच नसती.

       तसेच धर्मनिरपेक्षता या मूळातच वदतोव्याघात व फसव्या/भ्रामक संकल्पनेच्या अज्ञानमूलक व स्वार्थी "राबणूकी"मुळे त्यावेळी मूठभर असलेल्या "हिंदू कट्टरवादा"ला खतपाणीच मिळाले. पाश्चिमात्य संस्कृती व विचारसरणी भारतासारख्या बहुविध संस्कृतीने संपृक्त देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सुद्धा प्रगती आणि विकासाला पूरक ठरू शकणार नसल्याचे विचार आपल्याला गांधी-दर्शनात पदोपदी आढळून येत असले तरी ते विचार "भारतीय धोरणा"चे अविभाज्य अंग होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गांधींच्या अकाली "निमण्या"ने भारतीयता या संकल्पनेला फूलवण्याची प्रकियाच जणू अवरूद्ध झाली. गांधींच्या "तोडी"चे नैतिक-समृद्ध नेतृत्व सुद्धा नसल्याने सत्ता-राबणूकदारांवर अंकुश ठेवू शकण्याची शक्यता सुद्धा मावळली. पर्यायाने "काँग्रेसला मत देण्यासाठी इमामांना इंदिरा गांधींनी वेळोवेळी केलेले आवाहन" आणि "शाहबानो प्रकरणात राजीव गांधींनी मुल्ला-मौलवींसमोर पत्करलेली शरणागती" तसेच "देशाच्या संसाधनांवर गरीब नव्हे तर धार्मिक अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, या स्वरूपाचे मनमोहनसिंग यांचे विधान" अशा "भूतकाळातील" घटना घडू शकल्या. वस्तूतः नेहरूंनी नमूद केलेली "ध्येये आणि उद्दिष्टे" ठामपणे, निष्पक्षपणे आणि राजकीय कौशल्याने राबविण्यात आली असती तर "अशा भूतकाळातील घटना" घडल्याच नसत्या, असे म्हटल्यास ते चुकीचे वा वावगे ठरणार नाही. 

    त्यामुळेच "विविधतेशी/बहुत्ववादाशी राज्यघटनेची बांधिलकी अजूनही साबित असली, तरी जमिनीवर आणि रोजच्या जीवनात बहुसंख्याकवादाचेच राज्य आहे. भारत अजून तरी हिंदू पाकिस्तान झालेला नाही ; मात्र आपल्या निर्मितीपासून तो कधी नव्हे इतका या संकल्पनेच्या जवळ पोहोचला आहे." हे भयसूचक(!) विधान लवकरच खरे ठरू शकते, असे माझ्यासारख्याला वाटू लागते.

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, जि.गोंदिया. 

(चलभाष: 7066968350)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन