आमचा गावकाका आणि भगवान बुद्ध
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
दि.14 जून 2019
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
□भगवान बुद्ध आणि आमचा गावकाका !
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गेले पंधरा-वीस दिवस असह्य पाठदुखीने त्रस्त असल्याने मी माॅर्निंग वाॅकला सुट्टी दिली होती. पण आज सकाळी सकाळी कळले की, आमच्या गावातील सुमारे नव्वद-पंच्यान्नव वर्षे वयाची एक वृद्धा गेल्या रात्री निसर्ग-शरण झाली. त्यामुळे तिच्या अंत्यविधी साठी मी गेलो असता स्मशान भूमीत अग्निसंस्कारानंतर "पचलकडी" साठी थांबलो होतो. स्मशानभूमीत कधी नव्हे तो आमचा 88 वर्षे वयाचा, तत्कालीन चौथी पास, गावकाका सुद्धा आला होता. (मयत वृद्धा त्याची वहिनी होती.) गावकाकाने मला स्मशानभूमीजवळील शेतातील आंब्याच्या घनदाट सावलीत नेले. आम्ही झाडाखाली बसलो व काका सांगू लागला...
काका म्हणाला----
□"मी 1942-43 मंधी चौथीत होतू. आमच्या गावची श्याळा बोहुत पुरानी, करीब सौ साल पुरानी आहे. आम्हालं हरिणखेडे नावाचे पोवार समाजाचे एक गुरूजी सिकवत होते. एक दिवस का झाला का, आम्ही इस्कुलात होतून अना इस्कूलाच्या सामनेच्या सडकेवरना एक मयत गेली तं आम्ही उभे होऊनस्यारी पाहू लागलून. (आमच्या समयी डेस्क-बेंच अना बसावाची पट्टी भी राहात नोहोती. आपापल्या घरून बसावालं पोतागिता आनूनस्यारी खाल्या जमीनीवरच गेळी मारूनस्यान बसावा लागे.) हरिणखेडे गुरूजी भी चुपचाप पाहू लागले. मयत पार झाल्यावर गुरूजी म्हणाले, तुम्हालं मी भगवान बुद्धाच्या एक-दोन मरणाच्या कथा सांगता. अना गुरूजी सांगू लागले......
□एका बाईचा तरणाताठा पोरगा मेला. बाई मोठमोठ्याना आठवू आठवू रडू लागली. त्या गावामंधी एका झाडाखाल्या आठ-दहा दिवसापासून भगवान बुद्धाचा निवास होता. मूनस्यार गाववाल्याईना बाईलं सांगला का, भगवान बुद्ध सिद्ध पुरुष आहेत, त्याईलं ईनंती केलीस तं ते तूझ्या पोरालं जीवंत भी करू शकतील. बाईलं भी ईश्वास वाटला अना ते भगवान बुद्धाजवर जाऊनस्यार तिच्या पोरालं जीवंत करून देवासाठी हात जोडून रडत रडत भगवान बुद्धालं ईनंती करू लागली. भगवान बुद्धाना बाईलं सांगलंन का, तिचा पोरगा जरूर जीवंत होयेल, तिना सिरफ एक मूठ तांदूर अस्या घरून मांगूनस्यार आनावा का ज्या घरातून अजवरी कोनीच मेला नसंल. बाईलं बळा हिरूख आला, ते गावभर घरोघरी फिरली. पर तिलं काही मूठभर तांदूर नाही भेटले. आता बाईलं समजला का भगवान बुद्धाना कोनता उपदेश केलंन. बाई सिद्दी आपल्या घरी गेली अना पोराची सतीगती केलंन. सतीगती झाल्यावर ते बाई भगवान बुद्धालं भेटावालं त्या झाडाखाली गेली. बुद्धाना ईचारलंन, बोहूत उसीर केलीस बाई, आनलीस का तांदूर? बाई म्हणाली, देवा मालं तुमचा उपदेश समजला, मरणालं ईलाज नसे, जो आला तो जायेल भी! मी आता तूमची सिष्याच झालू.
□मंज्या त्या गवार, अनपढ बाईलं बुद्धाना काहीभी न सांगता भी तिलं बुद्ध तत्त्वज्ञान समजला. एवढी समजदार, हुस्यार अना कुशल, "त" वरून ताकभात ओरखणारी होती, तहीची बाई. कारण तिलं ईचार करता येत होता, ईचार पेलता येत होता, तिलं आपूनहून आपला ईचार करावाची शहाणीव होती. तहीच्या गवार अना अनपढ आईमाईलं भी खुदचा ईचार करावाची बुद्धी होती, सारासार विवेक अना समजूतदारपनाना आपला ईचार आपूनच करावाची समज होती, मूनस्यार बुद्धाचा तत्त्वज्ञान भी ते अलगद समजू शकत होती....
□असी मरणाची कहानी सांगला आम्हालं आमच्या हरिणखेडे गुरुजींना!
□पर तुलं सांगता, अजची देढ-अकली बाई राह्यती तं बुद्धालं ढोंगी बाबा मनूनस्यार गावभर ढिंढोरा पिटती अना बुद्धालंच बदनाम करती, असा आजकालचा माहोल पाहूनस्यार मालं वाटते. आता जसजसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, तसतस्या आईमाईभी शिकू लागल्या. पर आपला खुदचा ईचार करावाची क्षमता अना शहाणीव मात्र गमावून बसल्या, पर-ईचारी झाल्या. दुस-याच्याईच्या ईचाराना ईचार करू लागल्या अना आपली पुरानी समजदारी व ग्यान हरवून बसल्या, आपली संस्कृती भी ईसरल्या...."
आणखी काही सांगणार होता आमचा गावकाका. पण "पचलकडी"ची घोषणा झाली आणि आम्ही अंत्यसंस्काराच्या शेवटच्या सामाईक कृतीसाठी सरणाजवळ पोचलो... आमच्या गावकाकाचे पुरातन(?) विचारां(?)चे प्रवचन अर्धवटच राहिले. (शब्द संख्या सुमारे 450)
□
@लखनपाल सिंह कटरे "अपराधी"
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया.
(14.06.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment