ते तीन कावळे : एक अनुभव (प्रकाशित)
□ ते तीन कावळे : एक अनुभव□
~~~~~~~~~~~~~~~~~~
काही काही अद्भुत, अनाकलनीय, ... अनुभव तर्क आणि बुद्धीला अर्थनिर्णयनासाठी आव्हानित करतात तेव्हा निसर्ग, प्रसरणशील विज्ञान आणि योगायोग यांची तात्पुरती का होईना मदत होते, पण पूर्ण समाधान मात्र होत नाही. माझा असाच एक अनुभव मी येथे नमूद करीत आहे.
कावळ्यांनाही माणसाळवता येते, असे कदाचित मारुती चितमपल्ली यांच्या लिखाणातून किंवा एखाद्या टीव्ही कार्यक्रमातून वाचल्या/पाहिल्याचे अंधुकसे स्मरते. निश्चित आठवत नसले तरी "कावळा" हा पक्षी माझ्यादृष्टीने एक गूढ पक्षी ठरत असल्याने वरीलप्रमाणे वाचन/दर्शनाची पुसटशी आठवण जागृत आहे. याच पुसट आठवणीच्या बळावर मी एक प्रयोग करण्याचे ठरविले होते व त्यासाठी निवृत्तीची प्रतीक्षा करीत होतो. दि.28 फेब्रुवारी 2013 ला निवृत्त झाल्यावर मी माझ्या छोट्याशा खेडेगावी (बोरकन्हार/झाडीपट्टी, ता.आमगांव, जि.गोंदिया, पूर्व विदर्भाचे अंतिम टोक) स्थायी झालो आणि कावळे माणसाळवण्याच्या प्रयोगाकडे वळलो.
माझ्या वाडवडीलांच्या सुमारे 150-200 वर्षे जुन्या वाड्याच्या अंगणात एक अशोकाचे मोठे डौलदार झाड होते. (फेब्रुवारी 2016 मध्ये ते तोडले.) त्या झाडावर सुमारे आठ-नऊ वर्षापासून कावळ्याचे एक "स्थायी" घरटे होते. कावळ्यांची वंशवृद्धी वर्षातून एकदाच होत असली तरी दोन्ही कावळा-कावळी(?) व त्यांच्यासोबत आणखी एक कावळा (नर की मादी हे मला ओळखता आले नाही.) असे तीन कावळे त्या झाडावरील त्या "स्थायी" घरट्याची वर्षभर निगराणी(?) करायचे. दुपारी वाड्याच्या खालच्या ओसरी(छपरी)तील आडव्या केलेल्या खाटेच्या गातीवर बसले असायचे. दुपारचे जेवण झाल्यावर मी त्या ओसरीत शतपावली करायचो तेव्हा मी खाटेजवळ जाताच ते उडून जायचे. पुन्हा बसायचे, मी परत जवळ गेलो की पुन्हा उडून जायचे. मी कोणतीच "प्रतिक्रिया" देत नसे, कारण मला त्यांना माणसाळावयाचे होते. असे करता करता दोन-तीन महिन्यात मी जवळ गेलो तरी ते तिन्ही कावळे खाटेच्या गातीवरच बसून रहायचे, उडायचे नाहीत किंवा दचकायचेही नाहीत. मी पोहे-मुरमुरे दिले तर खात असत, मला पाहून कावकाव करीत असत. माझी कावळ्यांना माणसाळवण्याची संथ प्रक्रिया हळूहळू सफल होत आहे, असे मला वाटू लागले होते.
एक पावसाळा संपला. त्या कावळ्यांची एक वंशवेल मावळली. नवीन पिल्ले सक्षम झाल्यावर अन्यत्र उडून गेली असावीत. पण ते तिघे मात्र कायम होते. दुसराही पावसाळा संपला. दुसरी वंशवेलही मावळली. तरी ते तिघे मात्र आपल्या स्थानावर कायम होते. आता जरा ते धीट झाले होते. मला बिलकुलही दचकायचे नाहीत. मला त्यांना माणसाळवण्याची कोणतीही घाई नव्हती. माझा हा संथगतीचा प्रयोग आणि माझा त्यानुसारचा दिनक्रम नियमितपणे सुरूच होता. हिवाळ्यात मी झाडाच्या अर्ध-सावली व अर्ध-उन्हात वाचत बसलो असताना ते हमखास माझ्या आसपास असायचे, कावकाव करायचे. मला साथ(!) द्यायचे.
असेच हिवाळ्याचेच दिवस होते. दुपारचे जेवण झाल्यावर मी ओसरीवर नेहमीप्रमाणे शतपावली करीत होतो. पण आज तिघांपैकी एकही खाटेवर नव्हता. मला वाटले गेले असतील कुठे इकडेतिकडे, माझी चाहूल लागल्यावर येतील कदाचित. मी असा विचार करीत असतानाच अंगणातल्या त्या झाडावर काहीतरी विचित्र अशी फडफड होऊ लागली आणि झाडाच्या पाना-फांद्यांना अडखळत एक कावळा (की कावळी?) झाडाखाली जमिनीवर पडून तडफडू लागला. मी तात्काळ जवळ गेलो व पाहिले तर तो जीवाच्या आकांताने पंख फडफडवत होता, चोचीतून पाण्यासारखा द्रव घरंगळत होता. थोड्याच वेळात तो शांत झाला, मेला तो माझ्यादेखत! कावळ्याचे असे मरण मी कधी पाहिले/वाचले/ऐकले नव्हते. मला खूप आश्चर्य वाटले. मला वाटले कुणीतरी काही वीष वगैरे ठेवले असेल अन्नात आणि ते खाल्ल्याने हा कावळा मेला असावा. त्यावेळी माझे वयोवृद्ध आईवडील दोघेही हयात होते, त्यांना ह्याबद्दल सांगितले असता ते सुद्धा आश्चर्यचकितच झाले. म्हणाले, अशाप्रकारे कावळा मरताना त्यांनीही कधीच पाहिले/ऐकले नाही.
माझ्या वाड्याच्या मागच्या अंगणात नारळाची दोन मोठी झाडे आहेत. पहिल्या कावळ्याच्या मृत्यू(!)नंतरच्या तीन-चार दिवसानंतरची घटना अशी की, दुपारचे जेवण घेण्यापूर्वी मी सहज नारळाच्या फांद्यांना लटकणा-या सुगरण पक्ष्यांची घरटी व त्यांचे "बांधकाम" न्याहाळत उभा होतो. तितक्यातच आणखी एक कावळा नारळाच्या फांद्यांतून पूर्वीच्या कावळ्यासरखाच तडफडत, पंख फडफडवत झाडाखाली पडला व तडफडू लागला. मी जवळ जाऊन पाहिले असता हा सुद्धा पूर्वीच्या कावळ्यासारखाच जीवाच्या आकांताने पंख फडफडवत होता व चोचीतून द्रव घरंगळत होते. थोड्याच वेळात हा सुद्धा गतप्राण झाला. आता मात्र माझ्यातील निवृत्त अधिकारी जागृत झाला व मी पशूसंवर्धन विभागाच्या संबंधितांशी चलभाष वर बोलून घडलेल्या दोन्ही घटनांबद्दल सांगून कावळ्यांवर काही लागण-रोग तर आला नाही याची शहानिशा करण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, अशी कोणतीही दुसरी तक्रार नाही. कदाचित विषप्रयोगामुळे असे घडले असावे असे सांगून त्यांनी ही घटना कोणत्याही गांभीर्याने न घेता झटकून दिली. मी सुद्धा यावर कोणताही पाठपुरावा केला नाही.
आता मात्र ओसरीवरील खाटेच्या गातीवर एकच कावळा (की कावळी?) दिसायचा. मी शतपावली करताना तो नेहमीप्रमाणे बसून कावकाव करीत रहायचा. पुन्हा तीन-चार दिवसानंतरची ही तिसरी घटना अशी की, मी आमच्या जुन्या वाड्याच्या बाजूलाच लागूनच बांधलेल्या सिमेंट-काँक्रिट-विटांच्या(?) नव्या(?) घराच्या पोर्चमध्ये वाचत बसलो होतो. तितक्यातच आणखी एक कावळा (की कावळी?) पूर्वीसारखाच धडपडत, उडत येऊन अगदी माझ्या समोरच अंगणात पडला व जीवाच्या आकांताने पंख फडफडवू लागला, चोचीतून द्रव सांडू लागला. थोड्याच वेळात हा सुद्धा गतप्राण झाला. आता मला थोडीशी का असेना अनामिक भीती वाटू लागली. मी पुन्हा पशूसंवर्धन विभागाच्या संबंधितांना चलभाष वरून सूचना दिली व कावळ्याचे पोस्टमार्टम करून रोगाच्या निदानासाठी विनंती केली. थोड्याच वेळात त्यांचा एक कर्मचारी येऊन कावळ्याचे "प्रेत" घेऊन गेला.
नैदानिक रिपोर्टबद्दल मी विचारले नाही व त्यांनी स्वतःहून सांगितलेही नाही. पण त्यानंतर आजवर एकही कावळा अजूनतरी "तशा"प्रकारे मरताना/मेलेला मला आढळून आलेले नाही. तसेच त्यानंतर सुमारे सहा महिने त्या झाडावर किंवा ओसरीवर एकही कावळा दिसला नाही.
सुमारे सहा महिन्यानंतर अशोकाच्या त्या झाडावरील त्या "स्थायी" घरट्या"वर" मात्र दोन कावळे निगराणी करताना दिसू लागले. ओसरीत अजूनही दिवसा आडवी खाट असायची पण तिच्या गातीवर मात्र आता हे कावळे बसत नव्हते.
त्या अशोकाच्या झाडाखाली, अगदी बुंध्याजवळच आमच्या कुलदैवताचा (शिवपिंडीचा) पिढ्यान् पिढ्या चालत आलेला मातीचा बोहला होता/आहे. त्या अशोकाच्या झाडाच्या मुळ्यांनी त्या बोहल्यावर "आक्रमणा"ला सुरूवात केल्याने माझ्या लहान भावाने ते झाड तोडले. कावळ्याचे ते स्थायी घरटे नष्ट झाले. आता आमच्या अंगणात पूर्वीसारखे कावळे "दिसत" नाहीत. अंगणात जवळच एक मोरचिल्ली चे बारमाही हरित राहणारे झाड आहे. परंतु कावळ्यांनी अजूनतरी त्याच्यावर घरटे बांधलेले नाही. आणि यानंतर मी कधीही कावळ्यांना माणसाळवण्याच्या भानगडीत(?) सुद्धा पडलो नाही.
वर नमूद प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर मी कोणतेही भाष्य वा टिपणी करू इच्छित नाही. या घटनेच्या अनुषंगाने माझ्या मनात काही प्रश्न उद्भवतात, ते प्रश्न सुद्धा मी अनुच्चारितच ठेवू इच्छितो. कारण अशा अनाकलनीय घटना या आजवरच्या ज्ञात तर्क आणि बुद्धीच्या कक्षेत सामावत नाहीत. विज्ञानाने निसर्गाचे सारे रहस्य अजून उलगडलेले नसल्याने आपण त्या "उलगडणा-या दिवसाची प्रतीक्षा" अवश्य करू शकतो. इति शम.
(शब्दसंख्या सुमारे 875)
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया (7066968350)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment