राजा समरादित्य आणि त्याची झोप (एक लघुकथा)
□राजा समरादित्य आणि त्याची झोप...
---(एक लघुकथा)---
--------------------------------------
राजा समरादित्य आणि त्याचा अमात्य ढाडूमल वेष बदलून रयतेचा आढावा घेत होते. राजाने व्यापा-याचा व अमात्याने त्याच्या सहाय्यकाचा वेष परिधान केला होता. दोघेही अप्रशिक्षित घोड्यांवर स्वार होऊन रयतेचा आढावा घेता घेता सायंकाळ केव्हा झाली हे त्यांना कळलेच नाही. चालता चालता ते एका नदीकिनारी पोचले. वसंत ऋतूला नुकतीच सुरुवात झाली होती. नदीकिनारी पळस आपली थंड आग ओकत बसला होता. आणि अशातही नदी मात्र दुथडी भरून वाहत होती. नदीकिनारीची सुनसान झालझुल एकांताला आणखी एकांतात बुडवत होती. अशावेळी राजमहालात लवकर पोहचणे राजाला आवश्यक वाटू लागले. पण नावेशिवाय नदी पार करणे शक्य नव्हते. वेष बदलून रयतेचा आढावा घेताना मागे परतू नये, असा राज पुरोहिताचा आदेश-वजा-सल्ला असल्याने मागेही परतता येत नव्हते.
अमात्य ढाडूमल एका उंचशा पळसाच्या झाडावर चढून आसपास, आजूबाजूला कोणी नावाडी आहे काय याची चाचपणी करू लागला. पण अशी कोणतीही चाहूल लागली नाही. अखेर ती रात्र उपाशीपोटी नदीचे पाणी पिऊन तिथे नदीकिनारीच व्यतीत करण्याचे राजाने निश्चित केले. ढाडूमलने वस्त्रात लपवलेला चाकू काढला, गवत कापले, करंजीच्या झाडाची उरलीसुरली पाने ओरबाडली व राजासाठी अंथरूण तयार केले. अमात्य मात्र रात्रभर पहारा देणार होता. दिवसभराच्या श्रमाने राजाने अंथरूणावर अंग टाकताच त्याला झोप लागली. अमात्य पहा-यावर होताच!
सुमारे अर्ध्या रात्री एक अक्राळविक्राळ पिशाच्च तेथे आला व अमात्याला दरडावून तिथून तात्काळ निघून जाण्यासाठी धमकावू लागला. आरडाओरडीने राजाला जाग आली. राजाने परिस्थिती आपल्या हातात घेतली, आपली खरी ओळख दिली व तिथे थांबावे लागण्याची कारणमीमांसा विशद केली. पिशाच्च वरमला, नरमला. म्हणाला मी माझ्या शक्तीने नदीच्या या किना-यावरून त्या किना-यावर टांग टाकून तुम्हा दोघांनाही तुमच्या घोड्यांसकट दुसर्या किनार्यावर पोचवून देऊ शकतो. राजाला हे पटले व क्षणार्धात राजा व अमात्य त्यांच्या घोड्यासहित नदीच्या दुस-या किनार्यावर होते. पिशाच्च मात्र दिसेनासा झाला.
राजा आणि अमात्य आता न थांबता घोड्यांवर स्वार होऊन राजवाड्याकडे रवाना झाले.
थोड्याच अंतरावर एक स्मशानभूमी लागली. तिथला प्रकार पाहून राजा आणि अमात्य घाबरूनच गेले. एक योगिनी एका थडग्याजवळ बसून काहीतरी मंत्र जोरजोरात बडबडत होती आणि त्या थडग्यातून एक नंगधडंग पुरूष देह हळूहळू जमीन चिरत बाहेर निघत होता. राजा आणि अमात्य हे दृश्य अगदी थिजल्यासारखे देखतच राहिले. त्या योगिनीला किंवा त्या शवाला यांच्या उपस्थितीची जणू फिकीरच नव्हती. ते नंगधडंग शव-शरीर बाहेर पडले. जमिनीवर झोपले. योगिनी निर्वस्त्र झाली आणि त्यांचा संभोगशृंगार सुरू झाला. राजा आणि अमात्य अक्षरशः घाबरून तिथून निसटले व घोड्यांनी धूम ठोकली.
अखेर पहाटे-पहाटे राजा आणि अमात्य राजवाड्यात पोचले आणि आपापल्या महालात झोपी गेले.
अजून त्या दोघांनाही जाग आलेली नाही....
(शब्द संख्या:- सुमारे 310)
□□□
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)/14.02.2019.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Comments
Post a Comment