प.नि.सं.प्रा.मु.नै.ग.

□प.नि.सं.प्रा.मु.नै.ग.□

~~~~~~~~~~~~~~~

○संपूर्ण-सुफल जीवनाची यशस्वीता आणि काही गुणधर्म...

(अभिव्यक्ती व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या परिप्रेक्षात)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

     मी सुमारे तीस-पस्तीस वर्षे रिडर्स डायजेस्ट, SEMINAR, लोकप्रभा, लोकसत्ता, सारख्या नियतकालिके/वर्तमान पत्रे यांचा वर्गणीदार वाचक राहिलो आहे. तसा तर मी 50 पेक्षा अधिक नियतकालिके आणि वर्तमान पत्रांचा नियमित वैयक्तिक वर्गणीदार वाचक आहे. पण आजकाल खूपच प्रचलित झालेल्या वैयक्तिक/व्यक्तिमत्व विकास, प्रगती, यशस्वीता, REBT (Rational Emotive Behavior Therapy)आदि संबंधाने त्यांच्या-त्यांच्या कोणत्याही अभ्यासवर्गाला न जाताही स्वयंविकासासाठी मानसशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र, विधीशास्त्र, पदार्थविज्ञान, आदिंच्या नियमित व अद्यावत माहिती, अभ्यास व ज्ञानार्जनासाठी मी (अन्य संबंधित साहित्य सुद्धा वापरले असले तरी) वर नमूद चार नियतकालिके/वर्तमान पत्रे यांचा खास उल्लेख केला आहे. 

     त्या वाचन व अभ्यासातून मी माझ्या पुरते सहा बिंदू निवडले आहेत, जे कोणत्याही व्यक्तीला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात संपूर्ण-सुफल यशस्वीतेसाठी उपयोगी, मार्गदर्शक ठरतात/ठरू शकतात. ते सहा बिंदू असे...

1)परिश्रम,

2)निष्ठा,

3)संयम,

4)प्रामाणिकपणा,

5)मूलभूत नैतिकता 

आणि 

6)गणिती वृत्ती.

    या सहा पैकी 1, 2, 3, 4 आणि 6 क्रमांकावरील संकल्पना स्वयंव्याख्यायित व स्वयंस्पष्ट असल्याने त्यांच्या संदर्भात वेगळा खुलासा वा भाष्य न करताही त्या संकल्पना कोणालाही सहज आकलन होतात/होऊ शकतात. मात्र क्रमांक 5 वरील "मूलभूत नैतिकता" या संकल्पनेची व्याख्या शब्दबद्ध करणे माझ्यासाठी महाकठीणच नव्हे तर असंभव सुद्धा ठरत आहे. त्यामुळे मी या संकल्पनेची कोणतीही व्याख्या न करता/देता फक्त एक उदाहरण देऊन त्याआधारे ही संकल्पना प्रत्येकाने आपापल्या आकलनाप्रमाणे आत्मसात करावी/समजून घ्यावी असे माझ्या बोलण्यातून/संवाद-संप्रेषणातून सांगत असतो.

   ते उदाहरण म्हणजे, "माझ्या पत्नीला वगळता पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक नारी (बालिका, कुमारीका, तरूणी, प्रौढा, म्हातारी सर्व) एकतर माझी कन्या/पुत्री असेल किंवा माझी आई असेल; अशी मनाची, हृदयाची शंभर टक्के शुद्ध भावना व विचारपद्धती  अंगिकारणे, म्हणजे मूलभूत नैतिकतेचे अनुपालन करणे होय." आणि मी या संकल्पनेची आजवर आपल्या जीवनात जाणीवपूर्वक व कटाक्षाने यथाशक्ति जपणूक करीत आलो आहे. पर्यायाने मी स्त्री-द्वेष्टा कदापिही नाही उलट मी स्त्री-पूजक आहे हे स्पष्ट व्हावे. (यासंदर्भात माझ्याबद्दल कोणाला जराशीही शंका असल्यास मी काम केलेल्या कोणत्याही कार्यालयातील कोणत्याही, आणि/किंवा माझ्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कोणत्याही महिलेला विचारून यासंबंधाने खात्री करता येईल.)

     हे सर्व पुराण सांगण्याचे कारण हे की, भारतीय संस्कृतीनुसार भारतीय नारीला बेटी डाॅडसन या आत्यंतिक(?) स्त्रीवादी महिलेचा आदर्श ठेवणे योग्य राहील की कस्तुरबा गांधी, विजयाराजे सिंधिया, सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन, मीरा कुमार, सुमित्रा महाजन, दुर्गा भागवत, ईरावती कर्वे,.....,प्रणिती शिंदे, पूनम महाजन, पंकजाताई मुंडे, सुप्रियाताई सुळे, मेधा पाटकर,..... आदिंचा भारतीय संस्कृती-पूरक आदर्श ठेवणे योग्य राहील? हा मला पडलेला प्रश्न आहे. भारतीय संविधानानुसार प्रदत्त मूलभूत अधिकारांनुसार अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य उपभोगताना भारतीय पुरुष असो वा महिलेला निर्बंध व पब्लिक फिगर-निरपेक्ष असे "स्वातंत्र्य" सुद्धा अभिप्रेत असावे काय? (असते काय?)

    भारतातील प्रधान मंत्री, कोणत्याही खात्याचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यातील कोणतेही मंत्री आणि/किंवा त्यांच्या पत्नी/पती करिता वस्त्रावगुंठनाचे व वर्तणूकीचे काही आदर्शवत सभ्यता-संकेत भारतीय परंपरेने निर्देशित केले आहेत काय? केले असल्यास ते भारतीय संविधानानुसार प्रदत्त व्यक्ती-स्वातंत्र्यावर व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे ठरतात/ठरत नाहीत काय? ह्या पदावरील व्यक्ती व पद-संन्निकट व्यक्ती ह्यांनी आपापल्या मर्जीनुसार अभिव्यक्ती व वैयक्तिक स्वातंत्र्य उपभोगताना भारतीय लोक संस्कृतीचे भान राखणे व आसीन लोकसेवक पदाच्या सभ्यते(?)चा मान राखणे आवश्यक ठरविले तर ते असंवैधानिक ठरून त्यांच्या मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे ठरेल/असेल काय? 

     की संविधान-प्रदत्त अभिव्यक्ती, वैयक्तिक आदि स्वातंत्र्य उपभोगताना बेटी डाॅडसन चा आदर्श पुढे ठेवून त्याप्रमाणे उपरोक्त स्वातंत्र्याचा निःसंकोचपणे वापर करतेवेळी संबंधितांनी आपापली संवैधानिक पदे, पद-संन्निकट नाते व लोकधारणा यांचा विचारही न करावा? की आपापली संवैधानिक पदे व तशी पद-संन्निकट नाती स्वखुशीने त्यागून मग, एक मुक्त व स्वतंत्र नागरिक या नात्याने, वाटेल ते व तसे अभिव्यक्ती व वैयक्तिक स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगावे, जेणेकरून चित्रपट संस्कृतीतील स्वातंत्र्याप्रमाणे मुक्त संस्कृतीचे पाईक होऊन भारतीय/लोक-संस्कृती/फंस्कृती वगैरेचा प्रश्नच गैरलागू ठरेल?

    (मी याद्वारे बेटी डाॅडसन ला खलनायिका म्हणून उद्घृत केलेले नाही. उलट मी बेटी डाॅडसन चा काही बाबतीत प्रशंसकच आहे. "विरंगी मी! विमुक्त मी!" या अंजलीताई जोशी यांच्या पुरस्कृत पुस्तकावरील माझी प्रतिक्रिया देताना मी 'आत्मनिर्भरतेचा प्रवास' अंगिकारणा-या बेटी डाॅडसन च्या हिंमत आणि साहसाची भलावणच केली आहे. मला फक्त भारतीय परिप्रेक्षात संवैधानिक पदासीन व्यक्ती व त्यांच्या संन्निकट-नातेदार व्यक्ती यांच्या संदर्भात हे संवाद-संप्रेषण साधायचे आहे.) 

    माझ्या समोर उपस्थित झालेले हे आलतू-फालतू वाटू शकणारे सम-सामयिक प्रश्न समजून घेताना संवाद-संप्रेषणाच्या प्रमुख चार प्रकारांपैकी आरोप व आक्षेप ह्या प्रकारांच्या चष्म्यातून न पाहता सल्ला-सूचना आणि/किंवा साधे विधान या प्रकारांच्या चष्म्यातून पहावे, असे आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. 

आगे आपकी अपनी मर्जी!

(शब्द संख्या  : सुमारे 630)

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार. (09.06.2019)

ता.आमगांव, जि.गोंदिया (पूर्व विदर्भ)/7066968350.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन