राजा कोमलादित्य ची कथा (एक लघुकथा)
□"राजा कोमलादित्य ची कथा..."
•••••••••••••••••••••••••••••••••
राजा ललितादित्य हा अतिशय प्रजाहितदक्ष असा लोकप्रिय राजा होता. त्याचा अमात्य मिरचूमल हा सुद्धा अतिशय प्रामाणिक, राजनिष्ठ असा चतुर राजनितीनिपुण व्यक्ती होता. दोघांनी मिळून आपल्या राज्याची त्यांनी चांगलीच भरभराटी केली होती. साहित्य, कला, संस्कृती या विषयांतही त्यांच्या राज्यात समृद्धी होती. राजा ललितादित्य स्वतः एक उत्कृष्ट कवी होता. संगीताचा तो जाणकार होता. त्याच्या दरबारात एकूण बारा संगीतकार होते, जे दिवसाच्या प्रत्येक प्रहराला पूरक-साजेशा संगीत-गायनासाठी सुप्रसिद्ध होते. मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ इतके प्रवीण होते की ललितादित्यच्या राज्यात कधीच दुष्काळ पडत नव्हता. आवश्यकतेनुसार पाऊस पाडण्यात मेघमल्हार गाणारे संगीतज्ज्ञ शतप्रतिशत सफल होत होते. अशा राजाला संतती नसल्याने तो कधीकधी उदास व्हायचा.
राजा ललितादित्यला मुख्य चार राण्या होत्या. नविनादेवी, आईनादेवी, प्रवीणादेवी व कामुनादेवी ही त्या राण्यांची नावे. नविनादेवीचे चार गर्भपात झाले होते व आता ती गर्भधारणेला पात्र नसल्याचे राजवैद्याने निदान केले होते. आईनादेवी आणि प्रवीणादेवी यांच्या माहवारी अचानक थांबल्या होत्या. राजवैद्याचे कोणतेही इलाज उपयोगी ठरले नव्हते. कामुनादेवीला दोन पुत्र झाले पण दुर्दैवाने ते दोघेही अतिअल्पजीवी ठरले. याउलट प्रत्येक राणीच्या दासींना मात्र राजापासून अनेक पुत्र झाले होते. पण राजा आणि राणी दोघांनाही त्या दासीपूत्रांच्या पितृत्वाची खात्री नव्हती. राजवैद्याने तसे जाणून घेण्यासाठी काही प्रयोगही केले पण ते प्रयोग राजा-राणी आणि अमात्याच्या खात्रीपुढे टिकले नाहीत. शिवाय राजा-राणी आणि अमात्याला अशाप्रकारे दासीपूत्रांना राजपूत्रांचा दर्जा देणे मान्यही नव्हते. राजपुरोहिताचा सुद्धा याला सख्त विरोध होता. त्यामुळे राजा कधीकधी उदास व्हायचा. या उदासपणात राजाकडून काही सुंदर रचना सुद्धा निर्माण झाल्या होत्या.
अशातच एके दवशी राज दरबार सुरू असताना सेवकाने खबर आणली की, द्वारावर एक ज्योतिषी आला असून तो राजाला भेटू इच्छितो. अमात्याने राजाच्या कानात काहीतरी सांगितले आणि राजाने त्या ज्योतिषीला दरबारात घेऊन येण्याची आज्ञा केली. ज्योतिषी दरबारात पोचला व राजपुरोहिताच्या बाजूला स्थानापन्न झाला. चर्चेदरम्यान ज्योतिषीने सांगितले की तो राजाच्या संतानप्राप्तीच्या इच्छेची पूर्तता करण्याचे उपाय जाणतो. पण हा उपाय तो सर्वांसमक्ष सांगू शकत नाही. त्यासाठी मग राजा, अमात्य आणि ज्योतिषी यांच्या एकांत-चर्चेची व्यवस्था करण्यात आली. त्या गुप्त चर्चेचा तपशील कोणालाही कळू शकला नाही. लगेच राज दरबार बरखास्त करून राजा, अमात्य, राजपुरोहित आणि तो ज्योतिषी राणी कामुनादेवीच्या महालाकडे रवाना झाले.
त्या दिवसानंतर दहा-अकरा महिने राजा आणि तो ज्योतिषी कोणालाही दिसले नाहीत. अमात्यानेच राजकारभार व्यवस्थितरित्या सांभाळला. या दरम्यान शेजारी राजाने संधीचा फायदा घेण्यासाठी राजा ललितादित्याच्या राज्यावर भयंकर आक्रमणही केले होते. पण अमात्य मिरचूमल आणि सेनापती जोरावरसिंह यांच्या कुशल रणनिती व सैन्यबळावर ते आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले होते.
बरोब्बर अकरा महिने नऊ दिवसांनी राजवाड्यातील नगारे वाजू लागले. राजा ललितादित्यने जनतेला दर्शन दिले व राजपूत्राच्या जन्माची खुशखबरी दिली. राज्यभर उत्साहात जणू दुसरी दिवाळीच साजरी करण्यात आली. या गदारोळात ज्योतिषी कुठे गेला, त्याचे काय झाले हे कळलेच नाही. पुढेही कधी हे गूढ उकलले नाही, कोणी तशी हिंमतही केली नाही.
हळूहळू दिवस सरत गेले. राजपूत्र अठरा वर्षांचा झाल्यावर त्याचा राज्याभिषेक करण्यात आला. राजा ललितादित्यने निवृत्ती पत्करली व तो तिन्ही राण्यांसह, (होय! कामुनादेवीला राजवाड्यातच सोडून) वानप्रस्थाश्रमासाठी वनागमन केले. वयोवृद्ध अमात्य मिरचूमल याच्या मार्गदर्शनाखाली राजपूत्र, आता महाराजा कोमलादित्य, याने राजकारभार सुरू केला.
एके दिवशी राजदरबार सुरू असताना वयोवृद्ध अमात्य मिरचूमलने एक घोषणा केली की, राजवाड्याच्या दक्षिण बाजूला वाहणा-या बारमाही नदीच्या पात्रात काल एक वयोवृद्ध व्यक्ती सापडली. ती व्यक्ती नदीच्या पाण्यावर पद्मासनात बसून ध्यानमग्न असताना काही सैनिकांनी त्याला पाहिले व ती खबर अमात्याकडे पोचवण्यात आली. अमात्याने स्वतः नदीकिनारी जाऊन खात्री केली व त्या ऋषितुल्य व्यक्तीला राजवाड्यात आदरपूर्वक आणण्यात आले. त्या ऋषितुल्य व्यक्तीला राजा कोमलादित्य आणि राजमाता कामुनादेवीने राजवाड्यातच निवास करण्याची विनंती केली. त्या व्यक्तीने काहीही आढेवेढे न घेता ही विनंती मान्य केली. ती व्यक्ती आता राजदरबारात प्रवेश करणार आहे, तरी सर्वांनी त्यांचा आदरपूर्वक स्वागत करावा.... आणि एक वयोवृद्ध व्यक्ती राजदरबारात हळूहळू प्रवेश करती झाली. काही वयोवृद्ध दरबारींना त्या व्यक्तीचा चेहरा ओळखीचा वाटत होता, कदाचित तो "तो ज्योतिषी" तर नसावा, अशा शंकेतच ती व्यक्ती राजा कोमलादित्याच्या बाजूच्या उच्चासनावर आरूढ झाली...!
(शब्द संख्या :- सुमारे 510)
□□□
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार-441902, (15.02.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment