...आणि त्यानंतर ! (एक लघुकथा)

बोरकन्हार-441902,           दि.04.06.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

   □...आणि त्यानंतर ! (एक लघुकथा)

   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         दुपारचे जेवण जरा उशीरानेच झाले. निवृत्त जीवन निसर्ग-स्नेही खेडेगावात जगत असताना धावपळ, वेळसोबतची शर्यत या बाबींना सुद्धा निवृत्ती प्रदान केली होती. रमतगमत, सुस्त तरी मस्त, निसर्गाधारित ग्रामीण जीवनाचा आस्वाद घेत जगण्याचे प्रयत्न सुरू होते. उन्हाळ्याचे कडक गरमीचे दिवस आजकाल शहर आणि खेडेगावात कोणताही भेदभाव करत नसतात. तरी खेडेगावात अजून तरी एसी ची फॅशन रूजू झालेली नाही. पंखे आणि कूलर ने गरमीचा मुकाबला सहज होऊ शकतो. मी कूलर सुरू करून जमीनीवर खालीच बिस्तर टाकून आडवा झालो. कूलरच्या सेमीकूल वातावरणात मला केव्हा गाढ झोप लागली, काही कळलेच नाही. 

       काही वेळाने रोजचा रूटीन असल्यासारखा ग्रामीण भागातील वीज-खंडित होण्याचा रिवाज पाळण्यात महावितरणने बिलकुल कोणतीही कुचराई केली नाही. त्यामुळे माझी झोप पळाली व मी उठून बसलो. आणि मी आश्चर्याने आ वासून पाहातच राहिलो. मी एका अतिभव्य राजवाड्यात विस्तीर्ण अशा मखमलच्या बिछान्यावर बसून होतो. माझ्या दोन्ही बाजूला दोन दोन सुंदरतम दासी पंखा झुलवीत होत्या. मी उठून बसल्यामुळे एका दासीने थंड सुगंधी सरबतासारखे पेय एका सुवर्णपात्रात आणून माझ्यासमोर धरले. मी सुद्धा बेधडक ते सुवर्णपात्र उचलून त्यातील पेय पीवू लागलो. त्या पेयाचा स्वाद अवर्णनीय होता. पात्र एका दमात रिकामा करून मी ते पात्र परत देण्यासाठी पुढे पाहिले तर प्रत्यक्ष इंद्रदेव हात जोडून माझ्यापुढे उभे होते. इंद्रदेवांनीच ते पात्र घेतले व दासीला परत केले. इंद्रदेव अचानक बिछान्यावर माझ्या पायाजवळ बसले व माझे पाय चुरू लागले. मी सुद्धा निसंकोच इंद्रदेवाकडून पाय चुरून घेऊ लागलो. 

       थोड्यावेळाने इंद्रदेव थांबले व मला अतिशय नम्रपणे म्हणाले, "गुरूदेव, आपण इकडे येताना थकले असाल, पुन्हा थोडा आराम करावा. आम्ही सारे देवलोक आपल्या सेवेसाठी उत्सुक आहोत. खूप काळापासून स्वर्गलोकात आपली प्रतीक्षा होती. आपण असे अचानकच याल अशी भविष्यवाणी आमच्या पुरोहितांनी केली होती. त्यामुळे आम्ही बाराही महिने चोवीस तास अगदी तत्परतेने आपली प्रतीक्षा करीत होतो. आता आपण आला आहात, तर आरामात आपले उद्बोधन आम्ही ऐकणारच, पण त्यापूर्वी आपण पूर्ण विश्रांती घ्यावी." मी हे सगळे ऐकून, पाहून सुखावत होतो. आश्चर्याला दाबून चेह-यावर हास्य फूलवीत बसून होतो. अखेर इंद्रदेवांच्या वारंवार आग्रहानंतर मी पुन्हा बिछान्यावर आडवा झालो.  दासी पंखा करीतच होत्या. आसमंतात एक विशिष्ट प्रकारचा सुगंध आपले अस्तित्व जाणवून देत होता. अशा रहस्यमय आणि गूढ तरी हव्याहव्याशा वाटणा-या स्थितीत मला पुन्हा झोप लागली व मी गाढ झोपेत समाविष्ट(?) झालो.

       आता पुन्हा झोप उघडली आणि मी डोळे चोळत उठून बसलो. मी माझ्या घरीच जमीनीवरील आपल्याच बिस्तरावर होतो. सायंकाळ होत आली होती. सूर्य मावळतीला सरकून विझण्यासाठी क्षितिजाला विनवत होता. मी पूर्ण हतबुद्ध होऊन इकडे-तिकडे पाहू लागलो होतो.

     ...आणि 

     त्यानंतर... मला कोठल्यातरी दवाखान्यात भर्ती करण्यात आले. तेव्हापासून मी तेथेच असलो तरी त्या दवाखान्याचा पत्ता मात्र मला ठाऊक नाही. 

(झाडीबोलीतील काही शब्द जाणीवपूर्वक वापरले आहेत. )

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.

(झाडीबोलीतील काही शब्द जाणीवपूर्वक वापरले(!) आहेत.)

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,

जि. गोंदिया (04.06.2019)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन