□1980 : दोन प्रसंग : आठवणीत रूतलेले.

*1980 : दोन प्रसंग : आठवणीत रूतलेले.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      1978-79 शैक्षणिक वर्षात मी शहीद जान्या-तिम्या 

जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगांव (तत्कालीन जिल्हा भंडारा) या शाळेत 3B1 नियमांतर्गत गणित-विज्ञान शिक्षक म्हणून प्रथमच रूजू झालो. उन्हाळ्याच्या सुटीत आम्हाला कार्यमुक्त (terminate?) केले जायचे. जून मध्ये शाळा सुरू झाल्यावर पुन्हा नियुक्त केले जायचे. आमची नियुक्ती फक्त पाच-पाच महिन्यांकरिताच असायची. दरम्यान चार-पाच दिवसांची गॅप देऊन पुन्हा नियुक्ती केली जायची. उन्हाळ्याच्या सुटीत दोन महिने आम्हाला नियुक्ती नसायची.

      1979-80 करिता माझी फेरनियुक्ती जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, देवरी (तत्कालीन जिल्हा भंडारा) येथे केली गेली. तिथे श्री.ज्ञानेश्वर झा हे प्राचार्य होते. त्यांच्यासोबत माझी एवढी गाढ गट्टी व भक्ती जुळली की मी देवरी सारख्या तत्कालीन आदिवासी गावात, पिण्याच्या पाण्याचीही भयंकर किल्लत असलेल्या गावात, बाहुल्याने असलेल्या आदिवासी विद्यार्थांच्या सहवासात अक्षरशः रमलो. 

      जून 1980 मध्ये पुनर्नियुक्ती देताना मात्र मला देवरी वरून कट्टीपार (ता.आमगांव) येथे हलवण्यात आले. कट्टीपार हे माझ्या गावापासून देवरी पेक्षा अर्ध्याहूनही कमी अंतरावर असले तरी तिथे जाण्यासाठी बारमाही रस्ता नव्हता, प्रवासाचे सार्वजनिक साधन नव्हते. आमगांव नंतरच्या नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नाला पार करण्यासाठी पुष्कळदा डोंग्याचा वापर करावा लागे. आणि बोरकन्हार ते कट्टीपार हे सुमारे 12 किमी अंतर मला सायकलने जावे लागायचे. म्हणून मला कट्टीपारची नियुक्ती नापसंत असल्याने मी देवरीसाठीच प्रयत्नात होतो. 

     एका पावसाळी दिवशी रात्रभर पाऊस आल्याने आमगांव नाल्याला पूर आलेला होता. मी सायकलने त्या नाल्यापर्यंत पोचलो व अन्य प्रतीक्षारत लोकांसोबत "पाणी उतरण्याची" प्रतीक्षा करू लागलो. अखेर दोनेक तासात पाणी थोडे कमी झाले. काही हिंमतबाजांनी नाला पार केला. मी सुद्धा हिंमत केली व सायकल ढकलत काही सहप्रवाशांसोबत नाल्यात प्रवेश(?) केला. नाल्याच्या पाण्याला ओढ जास्त असते, हे ऐकून माहित असले तरी अशा पाण्यातून नाला पार करण्याचा मला कोणताही पूर्वानुभव(!) नव्हता. अखेर अर्धा नाला पार केल्यावर मी सायकल सकट वाहू(?) लागलो, ओरडलो. सोबतच्या सहप्रवाश्यांनी मला कसेबसे दुस-या किना-यावर पोचवून दिले. मी सुमारे दोन-तीन तास उशीरा शाळेत पोचलो. हकीकत सांगितली. सायंकाळी परतलो तोवर नाल्याचे पाणी उतरून गेले होते. मी सुखरूप घरी पोचलो. 

     दुस-या दिवशी कट्टीपारला न जाता देवरीला गेलो. झा सरांना भेटलो. जिल्हा परिषद चे तत्कालीन अध्यक्ष श्री.राधेश्यामजी अग्रवाल (डवकी/देवरीचे) यांच्या नावे पत्र घेतले व देवरी-भंडारा राष्ट्रीय महामार्गाने भंडारा जाण्यासाठी बस पकडली. रात्री भरपूर पाऊस येऊन गेला होता. डोंगरगावच्या पुढच्या नाल्याच्या पूलावरून तीन-चार फूट पाणी वाहत होते. संपूर्ण ट्रॅफिक जॅम झाले होते. तीनेक तास वाट पाहूनही पाणी न उतरल्याने एक गोंदिया-भंडारा बस गोंदियालाच उलट/परत जायला निघाली होती. मी भंडारा जाण्याचे स्थगित करून गोंदियाला परत गेलो. गोंदियाला पोचल्यावर कळले की संजय गांधी यांचा विमान अपघात होऊन त्यात ते दगावले. तारीख होती 23 जून 1980. 

     दुस-या दिवशी "बंद" राहण्याची शक्यता लक्षात घेऊनही मी ट्रेनने भंडारा येथे जाऊन श्री.राधेश्यामजी अग्रवाल यांची भेट घेतली. त्यांना झा सरांची चिठ्ठी दिली व त्यानंतर लवकरच कार्यालयीन चक्र फिरू लागले. सायंकाळी मला सुधारित चक्रमुद्रित आदेश मिळाला व माझी देवरी येथेच फेरनियुक्ती झाली. 

       त्यानंतर जुलै-1980 ते 04 मे 1984 पर्यंत 3B1 चा फायदा उठवत मी शिक्षक असतानाच वेगवेगळ्या नोक-या केल्या, व त्या आठ-पंधरा दिवसातच सोडल्या सुद्धा. शेवटी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात निवड झाल्याने अखेर शिक्षकी-पेशा(?) सोडून 05 मे 1984 ला महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित सेवेत दाखल झालो. व 28.02.2013 ला निवृत्तीपर्यंत त्या विभागात कायम राहिलो.

        निवृत्तीनंतर आता मी माझ्या जन्मगावी स्थायिक झालो असून "आजच्या" बोरकन्हार-आमगांव-कामठा-रावणवाडी या "सुधारित" राज्य-मार्गाने व बोरकन्हार-देवरी-भंडारा-नागपूर या "अति-सुधारित" राष्ट्रीय महामार्गाने जाताना जून 1980 मधील आमगांंव नाल्यात मी वाहू लागल्याचा व त्याच्या दुस-याच दिवशीचा संजय गांधी यांच्या अपघाताचा प्रसंग, हे दोन्ही माझ्या आठवणीत ठाण मांडून बसलेले प्रसंग, समोर उभे राहतात. आणि "तो" इतिहास "त्याच्या" भूगोलासह नजरेपुढून तरळून जातो 

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार.

  जि.गोंदिया. (25.02.2019)

¤¤¤¤¤¤¤¤¤¤|||••••••|||¤¤¤¤¤¤¤

     

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन