झाडीपट्टीच्या लोकजीवनातील "वाघ" नदी.

*झाडीपट्टीच्या लोकजीवनातील "वाघ" नदी!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
        पूर्वीच्या सी.पी.ॲण्ड बेरार मधील झाडीपट्टीच्या अगदी मध्यभागी असणा-या सध्याच्या गोंदिया जिल्ह्याची जीवनदायिनी वाघ नदीचे या भागातील लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाघ नदीचा उगम सध्याच्या छत्तीसगढ़ राज्यातील असल्याची एक लोकमान्यता असून तिच्या उगमस्थानाजवळच्या एका गावाचे नावच बाघनदी आहे. (हिंदीत वाघ चा उच्चार सहसा बाघ असा केला जातो.)//(या नदीचा उगम गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील वांढरा(डोंगरगाव) येथील टेकड्यांतून झाला असे सुद्धा/अधिकृतरित्या मानले जाते.) बाघनदी हे गाव आजच्या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण) च्या "जमान्या"त  वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघ नदीचे ग्रामसौंदर्य मात्र या गावाने अजूनही जरासे जपलेले आहे. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील हे गाव आपल्या "अजीबोगरीब" नावाने या महामार्गाने जाणा-या येणा-यांना मोहवून घेते व किमान चहा तरी घ्या म्हणून प्रवाशांना(!) खुणावते. 

       अशी ही आमची, महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकावरील गोंदिया जिल्ह्याची एक जीवनदायिनी, वाघ नदी एकेकाळी बारमाही प्रवाही नदी होती, हे आज कदाचित खरेही वाटणार नाही. माझे गाव बोरकन्हार हे या नदीच्या किना-यावरच वसले असले तरी नदीपर्य॔त पोचण्यासाठी कन्हारमातीच्या शेतातूनच सुमारे एक-दीड किलोमीटर चालावे(!) लागते. एकेकाळी या बारमाही प्रवाही नदीत उन्हाळ्यातही भरपूर पाणी राहत असल्याने गावातील गुरेढोरे दिवसातून एकदातरी या नदीला कवटाळतच असत. या नदीच्या पात्रात बोरकन्हार व भजेपार या गावादरम्यान एक खोल डोह होता. त्या डोहातील पाण्याची खोली किती असेल, यावरही एकेकाळी वाद-संवाद होत असत. कोणी म्हणे एका खाटेची रस्सीही पुरणार नाही, तर दुसरा म्हणे, नाही गा! तेवढा खोल नसे डोह, असेल दहा-वीस फूट खोल! या वाद-संवादाचा अंतिम निष्कर्ष कधीच स्पष्ट मात्र होत नसे. या डोहाच्या काठावर एक उंबराचे मोठे झाड होते. ते झाड नंतर जेव्हा मी बालकवींची औदुंबर कविता वाचली व ग्रेस यांच्या संपादनाखालील "युगवाणी" च्या एका दिवाळी विशेषांकात त्यावरील गूढरम्य "लिखाण" वाचले तेव्हापासून माझ्या मनोविश्वात जीवंत झाले व आजही ते जीवंतच आहे. (आज ते झाड अस्तित्वशून्य झाले असले तरी!)
       आमची ही जीवश्चकंठश्च वाघ नदी आणि पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे आमच्याकडील मारबतचा दिवस यांचा एक अभिन्न असा स्मृतीबंध माझ्या मनोविश्वात आजही अगदी ताजा/जीवंत आहे. या नदीच्या अगदी काठावर आमची काही शेती होती/आहे. त्या शेतीत काही एक-दोन आंब्याची झाडे असल्याचे मला आठवते. पण ती शेती तेव्हाही व आजही पडितच आहे. त्या शेतीच्या व नदीच्या दरम्यान नदीच्या अगदी काठावर कटंगचे वनच होते. आजही त्याचा अंश शिल्लक आहे. तेथेच एक बेलाचेही झाड होते. आज ते नाही. या शेतीचे नाव म्हणजे, "मारबत टेकर!"
मारबत टेकर कां, तर.... मारबतच्या दिवशी अगदी पहाटे-पहाटे (सुमारे चार वाजता) गावातील प्रत्येक घरातून ओल्या कन्हारी मातीच्या मारबतीमध्ये तेल टाकून वात पेटवल्यावर ती मातीची लंबगोल मारबत हाती घेऊन, घरभर "ढेकुल, मोंगसा, राई-रोग, खासी-खोकला घेऊन जा गे मारबत!" असा घोष लावून, ती पेटती मारबत "थंडी करण्यासाठी" तिला त्या मारबत टेकरावर नेऊन तिथे दरवर्षीच्या मारबतीने झालेल्या उंचवट्यावर ती (आपापली) मारबत टेकवत असत. म्हणून तो "मारबत टेकर!"
      मारबत थंडी केल्यावर तिथे गावचा नंगारसी आपली आवेशात्मक ढोल वाजवू लागे. आणि तेथे मग कुस्तीचा फड जमायचा. पाच-सहा पहेलवान कुस्त्या खेळत. शेवटी जो जिंकेल त्याला छोटे-मोठे बक्षीसही दिले जाई. पण या कुस्ती-फडाचा उद्देश बक्षीस मिळवणे हा कधीच नसायचा, तो जणू मारबत "साजरा" करायचा गावक-यांचा एक आनंदमय रिवाजच जास्त असायचा!
       या मारबत थंडी करण्याच्या आणि कुस्तीच्या फंदात न पडता दरवर्षी मारबतीच्या दिवशी न चुकता दुथडी भरून वाहणा-या त्या भयकारी वाघ नदीला पोहून ओलांडणे व पोहतच परत फिरणे या आपल्या दरवर्षीच्या अखंड कार्यक्रमात(!) मग्न असणारा आमच्या गावचा बारीक शरीरयष्टीचा, नेहमी बिमार सारखा दिसणारा काशीराम मेंढे केव्हाचाच नदीत कुदला असे. त्याला कौतुकाने पाहणारे, जास्त दूर नको जाऊ असे ओरडून सांगून त्याची काळजी वाहणारे असे सारे नवसे गवसे आता काशीरामच्या त्या चिखलयुक्त पुराने डबडबलेल्या व भयंकर आवाज करणा-या पाण्यातील संथ पोहणे पाहण्यात दंग झालेले असत.
        आता मारबतच्या दिवशी त्या मारबत टेकरावर जाणे, कुस्तीचे फड जमणे/जमवणे, काशीरामचे (आता दिवंगत) पोहणे आणि मुख्य म्हणजे वाघ नदीचे दुथडी भरून वाहणे, ह्या सर्व बाबी "सशाच्या शिंगाप्रमाणे"(!!!) अदृश्य झाल्याहेत.
      आता आमची ही वाघ नदी भर पावसाळ्यातही आपल्या मर्जीने दुथडी भरून वाहू शकत नाही. 1967ते 1972 दरम्यान आमच्या या वाघ नदीवर पूजारीटोला येथे "पूजारीटोला धरण" बांधण्यात आले व आमची स्वतंत्र वाघ नदी आमच्या ताब्यात(!) आली. आता तिला स्वमर्जीने दुथडी भरून वाहता येत नाही. खूप पाऊस आला व पूजारीटोला धरण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले तरच "आमच्या" मर्जीनेच ती दुथडी भरून वाहू शकते. तसे पाहिले तर दर पावसाळ्यात दोन-तीन प्रसंगीच तिला अशी संधी मिळते. त्यामुळेच वाघ नदीचे बारमाही प्रवाही असणे सुद्धा आता ऐतिहासिक तथ्य मात्र उरलेय. पण त्यासाठी वाघ नदीचा एकही पुत्र वाघ नदीवर नाराज मात्र नाही. कारण तिच्यावरील पूजारीटोला धरणामुळे आता तिचे पुत्र धानाची खरीप व उन्हाळी अशी दोन्ही पीके घेऊ शकतात. म्हणजे असे म्हणता येईल की, वाघ नदीचा बारमाही प्रवाह-त्याग तिच्या पुत्रांसाठी काही प्रमाणात तरी सकारात्मकच ठरलाय.
    वाघ नदीच्या उगमावरील शिरपूर बांध व दरम्यानचा कालीसराड बांध हे सुद्धा वाघ नदीच्या उन्मुक्त, स्वमर्जी प्रवाहाला बाधक ठरले/ठरत असले तरी झाडीपट्टीची ही जीवनदायिनी वाघ नदीमाय नाराज नसावी, असे वाटते. कधीकधी तिचा संयम सुटतो व ती "भरकटते", हे खरे असले तरी एकंदरीत आमची वाघ नदी आम्हाला आजही प्रियच आहे व स्वतः संकोचूनही ती आपल्या पूत्रांच्या कामी पडतच आहे.
(शब्दसंख्या सुमारे 610)
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन