"पोवारी/पंवारी/पवारी" बोली/भाषेविषयी : एक संक्षिप्त टिपण

"पोवारी/पंवारी/पवारी" बोली/भाषेविषयी : एक संक्षिप्त टिपण.
¤¤¤¤¤¤▪▪▪¤¤¤¤
      पूर्व विदर्भातील झाडीपट्टीचे मुख्य जिल्हे म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि जुन्या सी.पी.आणि बेरार मधील तथा आताच्या मध्यप्रदेशातील बालाघाट, सिवनी, छिंदवाडा, बैतुल ह्या जिल्ह्यात झाडीबोली खालोखाल बोलली जाणारी बोली/भाषा म्हणजे "पोवारी/पवारी" बोली/भाषा. (भाषाशास्त्रीय अभ्यासकांच्या अभ्यासासाठी सविनय सादर करण्यात येते की, पोवारी बोली ही कालक्रमाच्या प्रवाहात पोवारी, पंवारी, पवारी अशा भाषेच्या मूळ, प्राकृत, अपभ्रंश या संज्ञा/संकल्पना लेवून सुद्धा कमीजास्त प्रमाणात संबोधिली जाते.) ही बोली/भाषा आजही जिवंत असूून ही बोली बोलणाऱ्या पोवार/पंवार/पवार समाजाची लोकसंख्या विदर्भ, महाकोशल(मध्य प्रदेश), छत्तीसगढ या भागात एका ढोबळ अनुमानानुसार सुमारे 38-40 लक्ष असावी. 
        भारत सरकारच्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणा-या भाषकांचा क्रमांक 42 वा असून एका ढोबळ अंदाजानुसार 38-40 लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार/पंवार/पवार समाजातील बहुतांश लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात.
     पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केलेय. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या "CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR" या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ.सु.बा.कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999 मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. (तथापि त्यांचा एक अनुमानवजा-तथाकथित व द्वेषमूलक अभिप्राय पोवार समाजाची अकारण व अनैतिहासिक स्वरुपाची बदनामी करणारा असल्याने पोवार समाजाच्या साधार विरोधानंतर मंजू अवस्थी यांनी त्याबद्दल क्षमा मागून तो अभिप्राय वगळला जाण्यायोग्य व अयोग्य असल्याचे लेखी स्वरूपात मान्य केले.) त्यानंतर डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी "पवारी ज्ञानदीप" हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी "पवार गाथा" तथा अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित केली आहेत. शिवाय साकोलीचे ॲड.मनराज पटले/पटेल यांनी सन 2000 च्या सुमारास पोवारी बोलीत भगवद्गीतेचा अनुवाद करून पोवारी बोलीतील कवितांची/रचनांची काही छोटी पुस्तिकाही प्रकाशित केल्यात.                  पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश (नगरधन?) मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वा-या करून समशेर गाजविली आणि आपण शूर राजपूतांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे.

        पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी/झाडीबोलीय आहे.
     पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत "ळ" हा ध्वनी नाही. मराठी ऋणशब्दातील "ळ"काराचा "र"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी "ळ" चा "ड" देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या "व" चा "ब" होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.
     पोवारांच्या बोली/भाषेत "श" हा ध्वनी नाही. "श"काराचा "स"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी,  जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. या बोली/भाषेत "ण" हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना येे आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.
       पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय "को" तर सप्तमीचा प्रत्यय "मा" असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ.
      अशा या ऐतिहासिक पोवारी बोली/भाषेच्या आणि त्यातील सााहित्याच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम 04 नोव्हेंबर 2018 ला नागपूर येथे "राष्ट्रीय पोवारी/पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे या मंडळाचे अध्यक्ष तथा ॲड.लखनसिंह कटरे हे एक उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. या बोलीचे पहिले साहित्य संमेलन फेब्रुवारी 2019 च्या 03 तारखेला घुमाधावडा/तिरोडा (जि.गोंदिया) येथे यशस्वीरित्या घेण्यात आले. तत्समयी या मंडळाचे सुमारे पन्नास पोवारी/पवारी साहित्यिक आजीव सभासद झाले होते. कोणतीही बोली ही त्या-त्या समाजाच्याच नव्हेे तर संंपूर्ण सामाजिक संंरचनेच्या/वस्तुस्थितीच्या ऐतिहासिक (तत्कालीन), समकालीन संस्कृतीची वाहक व धरोहर असल्याने अशा बोलींना मरू न देणे हे प्रत्येक साहित्यिकाचे कर्तव्य ठरते या भावनेतून पोवारी/पवारी बोली टिकविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
¤¤¤¤¤
@ॲड.लखनसिंह कटरे,                                   बोरकन्हार (जि.गोंदिया)-441902.

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन