माझी आई : कमलाबाई.
माझी आई : कमलाबाई
--------------------------
१६ मार्च १९३१ ते ३० जानेवारी २०१४ हा माझ्या आईचा, पूर्वाश्रमीच्या कमलाबाई रूपराम/रामरूप रहांंगडाले व लग्नानंतरच्या सौ.कमलाबाई मोहनलाल कटरे यांचा दीर्घ जीवनपट! माझ्या आईचे शिक्षण तत्कालीन वर्ग चार पर्यंतचेच. पण मराठी भाषा आणि गणित (विशेषतः अंकगणित व बीजगणित) या विषयातील तिचे प्रावीण्य अद्भूतच म्हणावे असे होते. मी आणि माझे तत्कालीन वर्गमित्र यांना आमच्या आठव्या वर्गापर्यंतचे कोणतेही अडलेले गणित समजावून, सोडवून देणे हा तिचा जणू हातचा खेळ. पुढे नवव्या वर्गापासून आम्हाला इंग्रजी माध्यमातील New Maths सुरू(?) झाले आणि माझ्या आईमागे लागलेला "गणित समजावून दे" हा आमचा लकडा थांबला.
मी माझ्या आईवडिलांची दुसरी संतान. माझा एक मोठा भाऊ, शुकदेव हा तीन वर्षाचा होऊन लिव्हरच्या तत्कालीन असाध्य बिमारीने गेला. तो गेल्यानंतर दोनेक वर्षे मुलबाळ न झाल्याने माझ्या आजीने माझ्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा प्रयत्नही केलेला. पण वडील माझ्या आई सोबत ठामपणे उभे राहिले. माझ्या आईने नवसादि उपक्रमां(?)चा आधार घेतला, जणू सपाटाच लावला. जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावरच जेवण घेण्यासारखे प्रयोग(?)ही केले. अखेर माझा जन्म झाला. पण मोठा भाऊ लिव्हरच्या बिमारीने गेल्याने मला अगदी Quarantine मध्ये ठेवल्यासारखे वाढवण्यात आले. आमच्या वाड्याच्या अंगणाबाहेर मी वयाच्या तीन-चार वर्षापर्यंत पडू शकलो नव्हतो. या कालावधीत माझ्या आईने माहेरी जाणेसुद्धा टाळले होते. बाहेरचे काहीही खायला द्यायचेच नाही, आईचे व बकरीचे दुध एवढेच माझे अन्न होते. माझ्या वयाच्या पाऊणेतीन वर्षाच्या दरम्यान माझ्या लहान भावाचा जन्म झाला आणि माझ्यावरील "बंधने" काही प्रमाणात शिथिल होऊ लागली. तरी वयाच्या सोळा-सतराव्या वर्षापर्यंत माझे प्रमुख अन्न बकरीचे व गाईचे दूध हेच होते. कदाचित त्यामुळेच डिसेंबर १९७१ मध्ये मला वर्षभर टिकलेला(?) टायफाॅईड झाल्यावर माझी पचनसंस्था जी कमजोर(?) झाली ती आजतागायत आपले अस्तित्व टिकवून(?) आहे.
तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक नंतर पुढील शिक्षणासाठी मला आमच्या बोरकन्हार गावापासून ३० किमी वरील गोंदिया (शरद पवारांच्या भाषेत "मिनी मुंबई") या शहरात जावे लागले. माझ्या आईने हट्टाने माझ्यासोबत स्वैंपाक व माझ्या "सेवे"साठी एक नोकर नेमून दिला. अशी ही "नोकर-व्यवस्था" १९७२ पासून १९८४ पर्यंत माझ्या आईने मला बदलू/टाळू दिली नाही. त्याकाळी बोरकन्हार-आमगांव-गोंदिया या भागात येस्टी ची सेवा उपलब्ध नव्हती. कृष्ण-गोपाल कंपनीच्या खाजगी बसेस चालायच्या. त्या बसच्या ड्रायव्हरला "पटवून" माझ्यासाठी बोरकन्हार वरून गोंदिया ला (३० किमी.) रोज सुमारे दोन लिटर दूध पाठवला जायचा. माझ्यासोबतचा नोकर बसस्टॅन्ड वर जाऊन दूधाचा डबा आणणे व खाली डबा पोचवून देण्याचेही काम करायचा. पुढे खाजगी बसेस बंद होऊन येस्टीची सेवा सुरू(!) झाल्यावर बसने दूध पाठविणे शक्य नसल्याने दुस-या एका नोकराला रेल्वेची पास काढून देऊन बोरकन्हार ते आमगांव सायकलने व आमगांव ते गोंदिया ट्रेन ने दररोज माझ्यासाठी गोंदियाला घरचे दूध पाठविण्यात माझ्या आईची महत्वपूर्ण भूमिका होती. शेवटी-शेवटी तर गोंदियाला माझ्याकडे एक दूधारू बकरीच पाठविण्यात आली होती. तिची देखभाल करायला नोकर होताच. एकंदरीत मला Quarantine मध्ये ठेवून "पोसण्याची" माझ्या आईची माया काही आटत नव्हती.
नोकरीनिमित्ताने मी महाराष्ट्रात बाहेर कोठेही असलो तरी खास करून आईच्या भेटीसाठी मला महिना-दोन महिन्यात गावी जावेच लागे. निवृत्तीनंतर मार्च २०१३ मध्ये जेव्हा मी माझ्या गावीच स्थायिक(!) झालो तेव्हा आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तोपर्यंत ती वात-रोगाने सुमारे ८०% विकलांग झाली असली तरी माझ्यासाठी कोणता स्वैंपाक करायचा, मला काय आवडते याचा ती रोज आढावा(!) घ्यायची. माझ्या जीवघेण्या अपघाताची व नंतरच्या माझ्या कॅन्सरची, तथा त्यानुसारच्या विविध शस्त्रक्रियांची माहिती तिच्यापासून लपवून ठेवावी लागे. मी बरा(!) झाल्यावर गावी जायचो तेव्हा मी त्याबद्दल तिला हसत-हसत(!) हे सर्व सांगत असे.
माझ्या कॅन्सरमुक्तीनंतरही नियमित चेकअप, खात्री साठी (PET SCAN करिता) दर वर्ष-सहा महिन्यांनी मला पुणे येथे (रूबी हाॅल) जावे लागायचे. (आता दीड-दोन वर्षात जातो.) त्याप्रमाणे जानेवारी २०१४ मध्ये मी अपाईंटमेंटनुसार पुण्याला जायला निघालो तेव्हा तिची तब्येत जरा नाजुकच होती. एका डाॅक्टर मित्राला तिची नियमित देखभाल करायला सांगितले व आईला म्हणालो की, लवकरच जाऊन येतो. तेव्हा ती म्हणाली, "जल्दी आ जाना, मेरा भरोसा नही है!" तिची तात्पुरती सांत्वना(!) करून मी पुण्याला गेलो आणि तिची तब्येत आणखी खालावली. मला तसे कळविण्यात आले मी PET SCAN उरकून तात्काळ दि.२५ जानेवारी २०१४ ला परत आलो. आणि तिची ती हालत पाहून मला रडताही येईना........!
कसीबसी ३० जानेवारी २०१४ च्या रात्री आठ वाजेपर्यंत तिने आपली जीवनरेखा कायम ठेवली व आम्हा चारही भाऊ-बहिणींच्या देखत ती निसर्ग-शरण झाली. त्याला आज आठ वर्षे होत आहेत.
निवृत्तीनंतर मी गावी आल्यावर तिला मला काही सांगायचेय असे खूप-सारे प्रसंग घडत गेले. मी तिला विचारायचो सुद्धा की, काय सांगायचे ते सांगून टाक. म्हणायची, "मै समाधानी हूँ, बताने लायक कुछ नही बचा|" पण मी तिचाच लाडका पुत्र, मला खरे काय ते कळायचे. पण अखेरपर्यंत ती काही यासंदर्भात बोलली नाही. ती गेल्यावर मी वडीलांना विचारायचो, "माँ कुछ बताना चाहती थी, क्या था वो?" यावर वडील फक्त विचित्र अनाकलनीय पद्धतीने हसायचे, पण ते सुद्धा शेवटपर्यंत काही बोलले नाही. काय असेल ते? हे माझ्यासाठी नेहमीकरिता एक गूढच राहणार आहे.
आज तिची आठवण येते आहे, तीव्रतेने! ती गेल्यावर ती सतत माझ्या स्वप्नात यायची, "मै आ रही हूँ" म्हणायची. अशा स्वप्नांना मानायचे किंवा नाही, हा प्रश्न अलाहिदा. पण १७ ऑक्टोबर २०१७ ला माझ्या नातीनच्या जन्मानंतर मला तसे स्वप्न पडलेले नाही. माझी आई माझ्या स्वप्नात येत नाही आता!
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-४४१९०२.
□□□
|||ॐॐॐॐॐॐॐॐ|||ॐॐॐॐॐॐॐॐॐॐ|||
Comments
Post a Comment